मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 फेब्रुवारी 2025
मुंबई, – बांगलादेशातील उपासमारीसह बेरोजगारीला कंटाळून बांगलादेश सिमेवरुन भारतात प्रवेश करुन मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या 27 बांगलादेशी नागरिकांना गुरुवारी एकाच दिवशी मुंबई पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. चालू वर्षांत आतापर्यंत 353 बांगलादेशी नागरिकांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली असून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या सर्वांना त्यांच्या मायदेशात पाठविले जाणार आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबईसह आसपासच्या शहरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक राहत असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाले होते. त्यामुळे मुंबई शहरात अनधिकृतपणे राहणार्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा, एटीएस आणि आय शाखेच्या अधिकार्यांना दिले होते. या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी अशा बांगलादेशी नागरिकांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना गुरुवारी एकाच दिवशी वेगवेगळ्या कारवाईत पोलिसांनी 27 बांगलादेशी नागरिकांना अटक केली असून त्यात काही महिलांचा समावेश आहे. त्यांच्याकडे भारतात वास्तव्यासाठी असलेले अधिकृत कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि विदेशी नागरिक कायदा कलमांतर्गत कारवाई करुन अटकेची कारवाई करण्यात आली होती.
चालू वर्षांत मुंबई पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई करुन 353 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. यापुढेही अशा बांगलादेशी नागरिकाविरुद्ध ही कारवाई सुरु राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुंबईसह आसपासच्या परिसरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांची माहिती मिळाल्यास नागरिकांनी ही माहिती मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुम क्रमांक 100 आणि 112 या हेल्पलाईन तसेच स्थानिक पोलिसांना द्यावी अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली आहे.