संगीतकार प्रितम चक्रवर्तीच्या स्टुडिओमध्ये 40 लाखांची चोरी
चोरीनंतर पळून गेलेल्या कर्मचार्याला जम्मू-काश्मीर येथून अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 फेब्रुवारी 2025
मुंबई, – बॉलीवूडचे प्रसिद्ध संगीतकार प्रितम चक्रवर्ती यांच्या गोरेगाव येथील स्टुडिओमधून सुमारे 40 लाखांची कॅश चोरी करुन पळून गेलेल्या ऑफिसबॉय कर्मचार्याला अखेर जम्मू-काश्मीर येथून मालाड पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. आशिष सयाल असे या कर्मचार्याचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी चोरीची सुमारे 38 लाखांची कॅश हस्तगत केली आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
विनित चंद्रकांत छेडा हा कांदिवलीतील डहाणूकरवाडी परिसरात राहतो. गेल्या दोन वर्षांपासून तो संगीतकार प्रितम चक्रवर्ती यांच्याकडे मॅनेजर म्हणून कामाला आहे. प्रितमचा युनिमुस रेकॉर्ड प्रायव्हेट लिमिटेड नावाचा म्युझिक स्टुडिओ गोरेगाव येथील रुस्तमजी ओझोन, 2002/टॉवर क्रमांक सहामध्ये आहे. तिथेच आशिष सयाल हा गेल्या सात वर्षांपासून ऑफिस बॉय म्हणून कामाला होता. 4 फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता मधू मंताना फिल्मचे निर्माता मधू संताना यांचा एक कर्मचारी प्रितम चक्रवर्ती यांच्या व्यवसायाचे सुमारे 40 लाख रुपये घेऊन आला होता. ही रक्कम विनित छेडा याने ताब्यात घेतल्यानंतर ती एका ट्रॉली बॅगेत ठेवली होती. यावेळी तिथे आशिष, अहमद खान आणि कमल दिशा आदी उपस्थित होते. बॅगेत पैसे ठेवल्यानंतर विनित काही कागदपत्रांवर सही घेणयसाठी प्रितम चक्रवर्ती यांच्या त्याच अपार्टमेंटमधील घरी गेला होता. काही वेळानंतर स्टुडिओमध्ये आल्यानंतर त्याला तिथे ती ट्रॉली बॅग दिसली नाही. त्यामुळे त्याने अहमद खानला बॅगेबाबत विचारणा केली होती. यावेळी त्याने आशिष सयाल हा प्रितम यांच्या घरी बॅग घेऊन गेल्याचे सांगितले. त्यामुळे त्याने आशिषला कॉल केला, मात्र त्याने कॉल घेतला नाही. नंतर त्याने त्याचा मोबाईल बंद ठेवला होता.
सुमारे 40 लाखांची कॅश घेऊन आशिष हा स्टुडिओमधून पळून गेल्याची खात्री होताच विनितने हा प्रकार प्रितम चक्रवर्ती यांना सांगितला. त्यांनी त्याला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर विनितने घडलेला प्रकार मालाड पोलिसांना सांगून तिथे आशिषविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आशिषचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना आशिष हा जम्मू-काश्मीर येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर मालाड पोलिसांचे एक विशेष पथक तिथे रवाना झाले होते. या पथकाने बुधवारी पळून गेलेल्या आशिषला चोरीच्या कॅशसहीत शिताफीने अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे