बोरिवलीतील बोगस कॉल सेंटरचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश
अॅपमधील तांत्रिक अडचण दूर करण्याचा बहाणा करुन फसवणुक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 फेब्रुवारी 2025
मुंबई, – बोरिवली परिसरात सुरु असलेल्या एका बोगस कॉल सेंटरचा गुन्हे शाखेच्या दहिसर युनिटच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत चौघांना पोलिसांनी अटक केली असून त्यात कॉल सेंटरच्या मालकासह तीन टिम लीडरचा समावेश असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन गवस यांनी सांगितले. संगणकातील मायक्रोसॉफ्ट अॅप्लिकेशनमधील तांत्रिक अडचण दूर करण्याचा बहाणा करुन ही टोळी अमेरिकन नागरिकांची फसवणुक करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या चारही आरोपींना किल्ला कोर्टाने सोमवार 24 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बोरिवलीतील वजीरानाका, अमरकांत झा मार्गावर अर्पण अपार्टमेंट या इमारतीचे बांधकाम सुरु असून याच इमारतीच्या तिसर्या मजल्यावर अनधिकृत कॉल सेंटर सुरु आहे. या कॉल सेंटरमधून संगणकातील मायक्रोसॉफ्ट अॅप्लिकेशनमधील तांत्रिक अडचण दूर करण्याचा बहाणा करुन अमेरिकेन नागरिकांची फसवणुक केली जात असल्याची माहिती युनिट बाराच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र शिरतोडे यांनी गंभीर दखल घेत प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन गवस यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सचिन गवस यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक बाळासाहेब राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रासकर, निलोफर शेख, सहाय्यक फौजदार लक्ष्मण बागवे, अल्ताफ शेख, पोलीस हवालदार कल्पेश सावंत, लिम्हण, चव्हाण, शैलेश बिवकर, विशाल गोमे, प्रसाद गोरुले, शैलेश सोनावणे, पोलीस शिपाई अरुण धोत्रे, चंद्रकांत शिरसाठ यांनी अर्पण इमारतीच्या तिसर्या मजल्यावर छापा टाकून तिथे सुरु असलेल्या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केला.
यावेळी तिथे असलेल्या कॉल सेंटरचा मालक आणि त्याचे तीन सहकारी क्लोसर, टिम लीडर अशा चौघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तपासात ही टोळी अॅपमधील अडचण दूर करण्याचा बहाणा करुन अमेरिकन नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्या बँक डिटेल्स माहिती घेऊन त्या डिटेल्सच्या आधारे बँक खाते हॅक करुन फसवणुक करत होते. त्यासाठी ते मायक्रोसॉफ्ट कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी असल्याची बतावणी करत होते. त्यांच्या अॅपमधील समस्या दूर करण्याचा बहाणा करुन त्यांच्याकडून गिफ्टकार्डच्या स्वरुपात पैसे घेत होते. या टोळीने आतापर्यंत अनेक अमेरिकन नागरिकांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
या कारवाईत पोलिसांनी सहा लॅपटॉप, वीस मोबाईल, दोन राऊटर, सहा स्पिकर हेडफोन असा 2 लाख 41 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता, आयटी, टेलिग्राम कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत नंतर कॉल सेंटरच्या मालकासह क्लोसर आणि दोन टिम अशा चौघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन गवस यांनी सांगितले.