मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 फेब्रुवारी 2025
मुंबई, – शहरात दोन वेगवेगळ्या घटनेत कर्तव्य बजाविणार्या पोलीस पथकाशी हुज्जत घालून, मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणल्याचा प्रकार वांद्रे आणि गोरेगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिडोंशी आणि वांद्रे पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करुन तीन आरोपींना अटक केली आहे. अरबाज जीमल खान, अभिषेक दिलीप सिंग आणि प्रदीप मोहन कांबळे अशी या तिघांची नावे असून अटकेनंतर या तिघांनाही वांद्रे आणि बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
देवेंद्र बबन कांबळे हे ठाण्यातील वागळे इस्टेट, शांतीनगरचे रहिवाशी असून सध्या ते वांद्रे पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी रात्री ते नाईट ड्युटीवर हजर झाले होते. रात्री उशिरा ते त्यांच्या सहकारी सहाय्यक फौजदार गायकवाड आणि चालक सहाय्यक फौजदार तांबे यांच्यासोबत परिसरात गस्त घालत होते. रात्री दोन वाजता मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला एक मॅसेज प्राप्त झाला होता. त्यात एका व्यक्तीने वांद्रे येथील चिंबई रोड, चिंबई मार्गावर काही गर्दुल्ले स्थानिक रहिवाशांना मारहण करत असून पोलीस मदतीची गरज असल्याची सांगितले होते. त्यानंतर देवेंद्र कांबळे हे त्यांच्या सहकार्यासोबत तिथे गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना दोन तरुण तीन ते चार लोकांना मारहाण करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी या दोघांनाही बाजूला करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळ ते दोन्ही तरुण नशा करुन जोरजोरात आरडाओरड करुन तिथे धिंगाणा घालत होते, त्यांची समजूत घालूनही त्यांचा धिंगाणा सुरुच होता. याच दरम्यान त्यांनी पोलिसांशी अरेरावी करुन त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वांरवार समजूत घालूनही त्यांनी देवेंद्र कांबळे आणि गायकवाड यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे परिसरातील वातावरण तंग झाले होते. काही वेळानंतर तिथे इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आले होते. यावेळी पोलिसांशी हुज्जत घालून शिवीगाळ करुन मारहार करणार्या दोन्ही तरुणांना बळाचा वापर करुन ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याविरुद्ध देवेंद्र कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अभिषेक सिंग आणि प्रदीप कांबळे हे दोघेही मूळचे रायगडचे रहिवाशी असून सध्या वांद्रे येथे राहतात. या दोघांना नशा करण्याचे व्यसन असून नशा करुन त्यांनी स्थानिक लोकांना मारहाण केल्याचे तपासात उघडकीस आले. अटकेनंतर या दोघांनाही शनिवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
दुसरी घटना गोरेगाव येथील संतोषनगर, बीएमसी कॉलनीतील सी वॉर्ड परिसरात घडली. याच परिसरात अरबाज जीमल खान हा 24 वर्षांचा तरुण राहत असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध दिडोंशी पोलीस ठाण्यात 19 हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्या वाढत्या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत त्याच्याविरुद्ध तडीपारची कारवाई केली होती. ही कारवाई सुरु असताना तो संतोषनगर, बीएमसी कॉलनी परिसरात आला होता. ही माहिती प्राप्त होताच पोलीस हवालदार पंढरीनाथ पवार, पोलीस शिपाई कांबळे, भंडारी, एटीसीचे पोलीस हवालदार दळवी आदीचे एक पथक तिथे गेले होते. यावेळी अरबाजने शासकीय कर्तव्य बजाविणार्या पोलीस पथकाला शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली होती. त्यांच्या शासकीय कामात अडथळा आणून त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या अरबाजला पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी पंढरीनाथ पवार यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शनिवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.