अपहरणासह लैगिंक अत्याराच्या गुन्ह्यांतील पळपुट्या आरोपीस अटक
जे. जे हॉस्पिटलमधून पळून गेल्यानंतर गावी गेला होता
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 फेब्रुवारी 2025
मुंबई, – अल्पवीन मुलीच्या अपहरण करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असताना वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे हॉस्पिटलमध्ये आणल्यांनतर पळून गेलेल्या संघर्ष म्हस्के नावाच्या एका 24 वर्षीय आरोपीला पंतनगर पोलिसांनी भुसावळ येथून अटक केली. जे. जे हॉस्पिटलमधून पळून गेल्यानंतर तो त्याच्या भुसावळ येथील गावी पळून गेला होता. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले असून त्याचा ताबा जे. जे मार्ग पोलिसांना देण्यात येणार आहे. त्यानंतर त्याचा पंतनगर पोलिसांकडून ताबा घेतला जाणार आहे.
यातील तक्रारदार घाटकोपर परिसरात राहत असून त्यांची सतरा वर्षांची बळीत मुलगी आहे. तिचे संघर्ष नावाच्या एका 24 वर्षांच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. 27 जानेवारी 2025 रोजी ती घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली होती. चौकशीनंतर ती भुसावळ येथे गेल्याचे उघडकीस आले. संघर्ष हा जळगावच्या भुसावळ, कंधारीचा रहिवाशी आहे. त्यानेच त्यांच्या मुलीचे अपहरण केल्याचे उघडकीस येताच त्यांनी मुलीच्या मिसिंगची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीसह मिसिंग झालेल्या मुलीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मेडीकलनंतर या मुलीवर संघर्षने लैगिंक अत्याचार केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहरणासह लैगिंक अत्याचार आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता त्याला वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
मेडीकलनंतर त्याला दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास अपघात विभाग येथे असताना जेवण देण्यात आले होते. यावेळी तो पोलिसांची नजर चुकवून पळून गेला होता. हा प्रकार तिथे उपस्थित पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. तो पळून गेल्याची खात्री पटताच पोलीस हवालदार रामराव गोपाळराव जाधव यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संघर्षविरुद्ध कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशांनतर त्याच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
परिसरासह सर्व रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतल्यांनतर संघर्ष हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात आल्याचे उघडकीस आले. तेथून तो भुसावळ येथे त्याच्या गावी पळून गेला होता. त्यापूर्वी त्याने त्याच्या नातेवाईकांना घडलेली माहिती सांगून तो गावी येत असल्याचे सांगितले होते. ही माहिती प्राप्त होताच पंतनगर पोलिसांची एक टिम भुसावळ येथे रवाना झाली होती. यावेळी तिथे आलेल्या संघर्षला पोलिसांनी अटक केली. त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले.