क्षुल्लक वादातून 33 वर्षांच्या व्यक्तीवर बॅटने प्राणघातक हल्ला
सायन येथील घटना; नातेवाईक आरोपीस अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 फेब्रुवारी 2025
मुंबई, – क्षुल्लक वादातून संकेत उमाकांत शिवकर या 33 वर्षांच्या व्यक्तीवर त्याच्याच नातेवाईकाने बॅटने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सायन परिसरात घडली. या हल्ल्यात संकेत हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सायन पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून आरोपी नातेवाईक राजेश भालचंद्र कोळी याला अटक केली आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना शुक्रवारी सायंकाळी पावणेआठ वाजता सायन येथील आदिजनता सोसायटीच्या तिसर्या मजल्यावरील गॅलरीत घडली. या सोसायटीमधील तिसर्या मजल्यावर संगीता उमाकांत शिवकर ही 61 वर्षांची वयोवृद्ध महिला तिच्या कुटुंबियांसोबत राहते. संकेत हा तिचा मुलगा तर आरोपी राजेश हा दिराचा मुलगा आहे. काही दिवसांपूर्वी संकेत आणि राजेश यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. याच वादातून शुक्रवारी सायंकाळी त्यांच्यात भांडण झाले होते. यावेळी तिसर्या मजल्यावरील गॅलरीत त्याने संकेतवर बॅटने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्याला गंभीररीत्या दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच सायन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी संगीता शिवकर या महिलेची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. तिच्या तक्रारीनंतर तिचा दिराचा मुलगा राजेश कोळी याच्याविरुद्ध पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या राजेशला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.