मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 फेब्रुवारी 2025
मुंबई, – एक लाखांच्या कर्जावर साडेतीन लाख रुपये परत करुनही आणखीन पाच लाखांची मागणी करुन एका महिलेसह तिच्या पतीला लाथ्याबुक्यांनी मारहाण केल्याची घटना मालाडच्या मालवणी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध मालवणी पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गिता गुप्ता, धिरज गुप्ता, निरज गुप्ता आणि गिताचा पती अशी या चौघांची नावे असून त्यांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे.
संगीता राजेंद्र शेलार ही महिला मालाडच्या मालवणी परिसरात राहत असून घरकाम करते तर तिचे पती रिक्षाचालक आहेत. याच परिसरात गिता ही महिला राहत असून ते दोघेही एकमेकांच्या दहा वर्षांपासून परिचित आहेत. गिता ही परिसरात व्याजाने पैसे देण्याचे काम करत होती. 2023 साली तिला पैशांची गरज होती. त्यामुळे तिने गिताकडून दोन रुपये टक्क्यांनी एक लाख रुपये घेतले होते. त्यासाठी तिने तिच्या घराच्या विक्रीचा करारनामा करुन घेतला होता. ते करारपत्र तिने एका वकिलाच्या मदतीने नोटरी करुन घेतले होते. या कर्जानंतर ती तिला दरमाह वीस हजार रुपये व्याज देत होती. डिसेंबर 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत तिने व्याजासह मुद्दल म्हणून तिला साडेतीन लाख रुपये दिले होते. त्यानंतर तिने तिचे शेवटचे 25 हजार रुपये देऊन तिच्या घराचे कागदपत्रांची मागणी केली होती. मात्र तिने तिला कागदपत्रे परत केली नाही.
उलट तिचे मुले धीरज गुप्ता आणि निरज गुप्ता यांनी तिच्या घरात येऊन तिला घर खाली करण्याची धमकी देत तिला शिवीगाळ व दमदाटी केली होती. घराचे कागदपत्रे हवी असल्यास या दोघांनी तिच्याकडे आणखीन पाच लाखांची मागणी केली होती. इतकेच नव्हे तर बॉटलमधील पेट्रोल दरवाज्यावर ओतून तिला आणखीन पाच लाख रुपये देणार अशी कबुली देण्यास भाग पाडले. हा संपूर्ण प्रकार तिने तिच्या मोबाईलवर रेकॉर्ड केला होता. 22 फेब्रुवारीला गिता, धिरज आणि तिचा पती तिच्या घरी आले आणि त्यांनी पुन्हा तिला पैशांसाठी जिवे मारण्याची धमकी दिली होती. तिच्या पतीला लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकाराने ती प्रचंड घाबली होती. तिने घडलेला प्रकार मालवणी पोलिसांना सांगून गुप्ता कुटुंबियांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची मालवणी पोलिसांनी गंभीर दखल घेत गितासह तिच्या पती आणि दोन्ही मुलांविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.