तीन कोटीच्या चोरीप्रकरणी हिरे व्यापार्याच्या मुलाला अटक
कार्यालयासह तिजोरीची चावी बनवून महागडे हिरे-कॅश पळविले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 फेब्रुवारी 2025
मुंबई, – तीन कोटीच्या चोरीप्रकरणी एका हिरे व्यापार्याच्या मुलाला डी. बी मार्ग पोलिसांनी अटक केली. निर्मम विपुल जोगाणी असे या 27 वर्षीय आरोपी मुलाचे नाव असून त्याने त्याच्याच वडिलांच्या ऑपेरा हाऊस येथील पंचरत्न इमारतीच्या कार्यालयासह तिजोरीची बोगस चावी बनवून तीन कोटीचे महागडे हिरे आणि पाच लाखांची कॅश चोरी केल्याचा आरोप आहे. चोरीच्या याच गुन्ह्यांत त्याला गिरगाव येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
57 वर्षांचे विपुल धिरजलाल जोगाणी हे हिरे व्यापारी आहेत. ते त्यांच्या कुटुंबियांसोबत लोअर परेल येथील सेनापती बापट मार्ग, लोढा वर्ल्ड क्रेस्ट, द वर्ल्ड टॉवर्समध्ये राहतात. त्यांचा हिरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून ऑपेरा हाऊस येथील मामा परमानंद मार्ग, पंचरत्न इमारतीच्या 1403/अ मध्ये त्यांचे स्वतचे एक कार्यालय आहे. निर्मम हा त्यांचा मुलगा असून त्यांना त्यांच्या व्यवसायात मदत करतो. 20 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी 2025 या कालावधीत त्यांनी त्यांच्या कार्यालयातील 2 कोटी 30 लाख रुपयांचे हिरे, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्याकडे दिलेले 70 लाख रुपयांचे हिरे तसेच कार्यालयातील पाच लाखांची कॅश असा तीन कोटी पाच हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केले होते. त्यासाठी त्यांनी त्यांच्या वडिलांच्या कार्यालयासह तिजोरीचे बोगस चावी बनविलीहोती. ही चावी बनविल्यानंतर त्याने ही चोरी केली होती. हा प्रकार नंतर विपुल जोगाणी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी डी. बी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. कार्यालयातील सीसीटिव्ही फुटेज आणि विपुल जोगानी यांच्या आरोपावरुन पोलिसांनी त्यांचा मुलगा निर्गम याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्यानेच कार्यालयासह तिजोरीची बोगस चावी बनवून या हिर्यांसह पाच लाखांच्या कॅशची चोरी केल्याची कबुली दिली होती. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यांत अटक केली. अटकेनंतर त्याला गिरगाव येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून चोरीचे हिरे आणि कॅश लवकरच हस्तगत केले जातील असे पोलिसांकडून सांगण्यात आले.