गुजरातच्या वयोवृद्ध कापड व्यापार्याचे खंडणीसाठी अपहरण
सुटकेसाठी अपहरणकर्त्यांकडून 68 लाखांच्या खंडणीची मागणी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 फेब्रुवारी 2025
मुंबई, – गुजरातच्या एका 60 वर्षांच्या वयोवृद्ध कापड व्यापार्याचे अज्ञात व्यक्तींनी खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यांच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्यांनी त्यांच्या मुलाकडे 68 लाखांच्या खंडणीची मागणी केली असून ही रक्कम एका अंगाडियामार्फत पाठविण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी अपहरणासह खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. अपहरणकर्ते तक्रारदारासह त्यांच्या वडिलांच्या परिचित असावेत असा पोलिसांचा अंदाज असून स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे संमातर तपास सुरु केला आहे.
यातील 42 वर्षांचे तक्रारदार हे मूळचे गुजरातच्या कच्छ, बच्छावचे रहिवाशी असून सध्या ते सांताक्रुज येथील वाकोला, प्रभात कॉलनीत राहतात. त्यांचा स्वतचा कपड्याचा व्यवसाय आहे. त्यांचे वयोवृद्ध वडिल आणि आई त्यांच्या गावी राहतात. त्यांच्या वडिलांचाही कपड्याचा व्यवसाय असून ते गुजरात येथून कपडे आणून त्याची मुंबई शहरात विक्री करतात. दर दोन ते तीन महिन्यानंतर ते मुंबईत येतात. मुंबईत आल्यांनतर ते त्यांच्याकडे राहतात. गुरुवारी 20 फेब्रुवारीला सायंकाळी साडेचार वाजता त्यांचे वडिल बच्छाव रेल्वे स्थानकातून कच्छ एक्सप्रेसने मुंबईला जाण्यासाठी निघाले होते. त्यामुळे त्यांच्या आईने त्यांना फोनवरुन ही माहिती दिली होती. मात्र ठरलेल्या वेळेत त्यांचे वडिल घरी आले नाही, त्यांना कॉल केल्यानंतर त्यांचा मोबाईल बंद येत होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे त्यांच्या वडिलांची चौकशी केली होती. मात्र ते त्यांच्याकडे गेले नव्हते. त्यामुळे त्यांनी त्यांचा शोध सुरु केला होता. मात्र बराच शोध आणि विचारपूस करुनही त्यांना त्यांच्या वडिलांविषयी काहीच माहिती मिळाली नाही.
चार दिवसांनी त्यांच्या मोबाईलवरुन त्यांना त्यांच्या वडिलांनी कॉल केला होता. यावेळी त्यांनी अज्ञात व्यक्तीने त्यांचे अपहरण केले असून त्यांच्या सुटकेसाठी पैशांची मागणी करत आहेत अशी माहिती सांगितली. याच दरम्यान दुसर्या व्यक्तीने त्यांचा फोन घेतला आणि त्यांच्या वडिलांचे अपहरण झाल्याचे सांगून त्यांच्या सुटकेसाठी त्यांच्याकडे 68 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. खंडणीची रक्कम दिली नाहीतर त्यांच्या वडिलांच्या हत्येची धमकी दिली होती. काही वेळानंतर या व्यक्तीने त्यांना पुन्हा फोन करुन एका अंगाडियामार्फत त्यांना 25 लाखांचा पहिला हप्ता पाठविण्यास सांगितले.
या प्रकारानंतर महेशकुमार चोधरी हे प्रचंड घाबरले होते. घडलेला प्रकार त्यांनी वाकोला पोलिसांना सांगून अज्ञात अपहरणकर्त्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणासह खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत वाकोला पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असून तक्रारदाराच्या वडिलांच्या मोबाईलची माहिती काढण्यात येत आहे. याकामी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे तीन ते चार पथक मुंबईसह मुंबईबाहेर रवाना करण्यात आले आहेत.