टास्कच्या नावाने महिलेसह दोघांची पंधरा लाखांची फसवणुक
कुर्ला आणि परळ येथील घटना; दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ मार्च २०२४
मुंबई, – टास्कच्या नावाने एका महिलेसह दोघांची अज्ञात सायबर ठगाने १५ लाख ३१ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणुक केल्याची घटना कुर्ला आणि परळ परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी रफि अहमद किडवाई मार्ग आणि नेहरुनगर पोलिसांनी दोन स्वतंत्र फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन तपास सुरु केला आहे.
पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार महिला परळ येथे राहत असून ती कुर्ला येथील एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. १७ फेब्रुवारीला ती तिच्या घरी होती. यावेळी तिचा मोबाईल क्रमांकाला ईजी रॅकिंग डिझीटल पार्टनर इंडिया या व्हॉटअप ग्रुपमध्ये ऍड करण्यात आला होता. या ग्रुपमध्ये दहाहून अधिक मोबाईलधारक ऍडमीन म्हणून कार्यरत होते. त्यांनी तिला वर्क फ्रॉर्म होम टास्कची माहिती देताना प्रत्येक टास्कमागे साठ रुपये कमिशन मिळेल असे सांगितले होते. त्यामुळे तिने ग्रुपमधील सर्व टास्क पूर्ण करण्यास सुरुवात केली होती. प्रत्येक टास्कमागे तिला कमिशन मिळत होते. तिच्या कामामुळे प्रभावित होऊन तिला ग्रुपच्या ऍडमिनने एका टेलिग्रामची लिंक पाठविली होती. त्यात तिला वेल्फेअर टास्कची विचारणा करुन त्यात जास्त कमिशनचे आमिष दाखविण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून तिने विविध वेल्फेअर टास्कसाठी ७ लाख ८६ हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. मात्र टास्क पूर्ण करुनही तिला मुद्दलसह कमिशनची रक्कम मिळाली नाही. तिने विचारणा केल्यानंतर तिला साडेतीन लाखांचा एक टास्क पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात आला होता. हा टास्क पूर्ण केल्यानंतर तिच्या खात्यात कमिशनसह इतर रक्कम जमा होईल असे सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने टास्क पूर्ण न करता त्यांच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्यांनी तिचा मोबाईल क्रमांक ब्लॉक करुन तिला ग्रुपमधून बाहेर काढले होते. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच तिने रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता.
दुसर्या गुन्ह्यांतील एका ३७ वर्षांच्या तक्रारदाराची अशाच प्रकारे साडेसात लाखांची फसवणुक झाल्याचे उघडकीस आले आहे. यातील तक्रारदार व्यावसायिक कुर्ला येथे राहत असून त्याचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. २७ फेब्रुवारीला त्यांना त्याच्या इंटाग्रामवर एक पार्टटाईमची जाहिरात दिसली होती. त्यामुळे त्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमंाकावर संपर्क साधला होता. यावेळी त्यांना समोरील व्यक्तीने विविध व्हिडीओ लाईक करुन त्याचे स्क्रिनशॉट पाठविल्यास कमिशन मिळेल असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी वेगवेगळे व्हिडीओ लाईक करुन ते पाठवून दिले होते. प्रत्येक व्हिडीओमागे त्यांना दोनशे रुपयांचे कमिशन मिळत होते. त्यानंतर त्याला टेलिग्रामवर जास्त कमिशनचे टास्क देण्यात आले होते. जास्त कमिशनच्या आमिषाला बळी पडून त्याने विविध टास्कसाठी साडेसात लाख रुपयांची गुंतवणुक केली होती. मात्र या गुंतवणुकीवर त्याला कुठलेही कमिशन देता त्याची फसवणुक झाली होती. त्यामुळे त्याने नेहरुनगर पोलिसांना ही माहिती सांगून तिथे अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या दोन्ही तक्रारीनंतर नेहरुनगर आणि रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत दोन गुन्हे दाखल केले आहे. या गुन्ह्यांचा पोलीस ठाण्यातील सायबर सेलचे अधिकारी तपास करत आहेत.