शहरात दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांवर प्राणघातक हल्ला
पिता-पूत्राला अटक तर पळून गेलेल्या दोघांचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम ं
28 फेब्रुवारी 2025
मुंबई, – शहरात दोन वेगवेगळ्या घटनेत एका तरुणासह दोघांवर त्यांच्याच परिचितांनी तिक्ष्ण हत्याराने वार करुन प्राणघातक हल्ला केला. या दोन्ही घटना पवई आणि वडाळा परिसरात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पवई आणि वडाळा टी टी पोलिसांनी दोन स्वतंत्र हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत पिता-पूत्राला वडाळा टी टी पोलिसांनी अटक केली तर दुसर्या गुन्ह्यांतील पळून गेलेल्या दोन्ही आरोपींचा पवई पोलिसांकडून शोध सुरु आहे.
मोहम्मद रफिक मेहंदी शेख हे इलेक्ट्रिशन असून ते वडाळा येथील एस. पी रोड, भारतीय कमला नगरात राहतात. सद्दाम हा त्यांचा लहान भाऊ असून तो त्यांच्यासोबतच राहतो. गुरुवारी रात्री दहा वाजता जुनैद आणि ताहा या दोन मुलांमध्ये खेळताना भांडण झाले होते. यावेही सद्दाम यांनी त्यांच्यातील भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी सद्दामने ताहाला ओरडल्याचा रागातून त्याचे नातेवाईकांनी त्याला लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्याकडील चाकूने त्याच्यावर वार केले होते. त्यात सद्दाम हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याच्या चेहर्याला, गालाला, गळ्यावर आणि कपाळावर गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ही माहिती मिळताच वडाळा टी टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सद्दामचा तक्रारदार भाऊ मोहम्मद रफिक याने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिघांविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर अनारुल अब्दुल माजिद खान आणि सोहेल अनारुल खान या दोघांना पोलिसांनी अटक केली. सुझेन खान नावाचा आरोपी पळून गेल्याने त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
दुसरी घटना पवई परिसरात घडली. क्षुल्लक वादातून शहावाज इम्रान शेख या 22 वर्षांच्या तरुणावर त्याच्याच परिचित दोन तरुणांनी चाकूने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात शहावाज हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी अवधेश आणि पवन या दोन्ही आरोपी तरुणाविरुद्ध पवई पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. ते दोघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ही घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजता पवईतील साकिविहार रोड, साईबाबा मंदिराजवळील आंबेडकर उद्यानासमोर घडली. शहावाज हा याच परिसरातील मिलिंदनगर परिसरात राहत असून त्याचा खेळण्याचा पाळणा चालविण्याचा व्यवसाय आहे. अवधेश आणि पवन हे दोघेही त्याच्या परिचित असून मित्र आहेत. बुधवारी दुपारी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. त्याचा त्यांच्या मनात राग होता. रात्री साडेदहा वाजता शहावाज हा आंबेडकर उद्यानासमोर आला असता या दोघांनी त्याच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. त्यात त्याच्या पोटाला आणि कानाला गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी शहावाजच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपी मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यानंतर ते दोघेही पळून गेले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.