मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 मार्च 2025
मुंबई, – न्यू इंडिया बँकेत झालेल्या सुमारे 122 कोटीच्या गैरव्यवहारप्रकरणी सध्या पोलीस कोठडीत असलेला मुख्य आरोपी अभिमन्यू सुरेंदरकुमार भोन याला बँकिंग क्षेत्राचा कुठलाही अनुभव नाही. त्याचा बँकेशी संबंधित शिक्षण झाले नव्हते. तरीही त्याला न्यू इंडिया बँकेत सीईओ बनविण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघडकीस आले आहे. त्याला सीईओ बनविण्यामागे कोणाचा सहभाग होता, त्यामागे संबंधितांचा काय उद्देश होता याचा पोलीस तपास करत आहेत.
न्यू इंडिया बँकेतील 122 कोटीचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर दादर पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरु आहे. गुन्हा दाखल होताच आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. त्यात बँकेचा महाव्यवस्थापक हितेश प्रविण मेहता, विकासक धर्मेश जयंतीलाल पौन आणि बँकेचा माजी सीईओ अभिमन्यू सुरेंदरकुमार भोन आणि मनोहर उन्ननाथन अरुणाचलम यांचा समावेश आहे. त्यापैकी हितेश मेहता आणि धर्मेश पौन हे न्यायालयीन तर अभिमन्यू भोन आणि मनोहर अरुणाचलम हे दोघेही मंगळवार 4 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत आहेत.
अभिमन्यू हा बँकेचा माजी सीईओ होता. हितेश मेहता हा त्याच्या हाताखाली काम करत होता. बँकेच्या कॅश इन हॅण्डची माहिती अभिमन्यूला होती. त्याचा लॅपटॉप पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्यात अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात पोलिसांना यश आले आहे. 122 कोटीपैकी जुलै 2019 मध्ये पंधरा कोटी, ऑगस्ट 2019 रोजी अठरा आणि वेळोवेळी सात कोटी हितेशने या कटातील वॉण्टेड आरोपी उन्ननाथन अरुणाचलम ऊर्फ अरुणभाई याला दिले होते. अभिमन्यूचे बॅकिंग क्षेत्राशी संबंधित शिक्षण झाले नव्हते. त्याला बँकेचा कुठलाही संबंध नव्हता. तरीही त्याला बँकेचा सीईओ बनविण्यात आले होते. यामागे कोणाचा सहभाग होता. याचा पोलीस तपास करत आहेत.