चोरीची तक्रार १०.७५ लाखांची; सापडले २.७० कोटी रुपये

२३ वर्षांच्या मोलकरीणीनेच चार महिन्यांत चोरी केल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ मार्च २०२४
मुंबई,  – घरच्या सदस्याप्रमाणे ज्या मोलकरणीवर विश्‍वास ठेवला तिनेच घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन सुमारे पावणेअकरा लाखांचा मुद्देमाल चोरी केल्याचा आरोप एका डॉक्टर महिलेने करुन तिच्याविरुद्ध पवई पोलिसात चोरीची तक्रार केली, मात्र गुन्हा दाखल होताच मोलकरणीला अटक केल्यानंतर तिने २ कोटी ७० लाख १७ हजार ५१५ रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले. तिच्याकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात पवई पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत अंजू अजय भगत असे या २३ वर्षीय तरुणीला पोलिसांनी अटक केली असून अटकेनंतर तिला अंधेरीतील लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

सिमा हेमंत दांडे या पवईतील हिरानंदानी गार्डन, आँर्चड ऍव्हेन्यूच्या ओडीसी दोन या उच्चभू सोसायटीमध्ये त्यासंचे पती हेमंत, मुलगा ईशान, सासू हेमलता यांच्यासोबत राहते. ती व्यवसायाने डॉक्टर असून तिचा हेल्थकेअर ऍडव्हरटायझिंग व कंन्स्टन्सीचा व्यवसाय आहे. तिचे पतीही डॉक्टर असून मुलगा एका खाजगी कंपनीत कामाला आहे. डॉक्टर असल्याने दोघेही पती-पत्नी कामानिमित्त बाहेर राहत होते. त्यात मुलाची नोकरी असल्याने तो दिवसभर कामावर असल्याने वयोवृद्ध सासूची देखभाल करण्यासाठी तिने अंजू भगत हिला कामावर ठेवले होते. अंजू ही मूळची छत्तीसगढ, लोडाम, जसपूरच्या आत्मजा अजय भगत, पुत्री चेराची रहिवाशी असून ती दांडे कुटुंबियांकडे गेल्या पाच वर्षांपासून काम करत होती. तिच्यावर त्यांचा प्रचंड विश्‍वास होता. कामात हुशार असल्याने ते तिला त्यांच्याच कुटुंबातील एक सदस्य म्हणून वागणुक देत होते. अनेकदा ते घरासह कपाटातील चाव्या तिच्याकडे सोपवून कामावर जात होते. नोव्हेंबर ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान सिमा या त्यांचे पती हेमंत आणि मुलगा ईशानसोबत दिल्ली, दुबई आणि उदयपूर येथे गेले होते. या दरम्यान घरात अंजू ही एकटीच राहत होती. घरात कोणीही नसल्याची संधी साधून तिने कपाटातील दागिने आणि कॅश असा सुमारे पावणेअकरा लाखांचा मुद्देमाल चोरी केली होती. हा प्रकार नंतर सिमा यांच्या निदर्शनास येताच तिने तिच्यावर पाळत ठेवली होती. ती बाहेर गेल्यानंतर विविध ज्वेलर्स दुकानात जात होती. जुने दागिने देऊन ती ज्वेलर्स व्यापार्‍याकडून नवीन दागिने खरेदी करत होती. तिच्या मोबाईलची पाहणी केल्यानंतर त्यात काही ज्वेलर्स व्यापार्‍याचे काही मॅसेज दिसून आले होते. तिनेच घरातील दागिन्यांची चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन सिमा दांडे हिने तिच्याविरुद्ध पवई पोलिसांत पावणेअकरा लाखांच्या मुद्देमालाची चोरी केल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अंजूविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदविला होता.

या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांनी गंभीर दखल घेत त्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कांबळे यांच्याकडे सोपविला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त भारतकुमार सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कांबळे, राहुल पाटील, पोलीस हवालदार तानाजी टिळेकर, बाबू येडगे, पोलीस शिपाई रवी ठाकरे, संदीप सुरवाडे, सूर्यकांत शेट्टी, रवी ठाकरे, सूर्यकांत शेट्टी, महिला पोलीस शिपाई शितल लाड, वैशाली माधवन, भारती, पोलीस हवालदार पिसाळ यांनी तपासाला सुरुवात केली होती. तपासादरम्यान अंजूची वागणुक संशयास्पद वाटताच तिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.

चौकशीत तिने सिमा दांडे यांचा विश्‍वास संपादन करुन, चार महिन्यांत घरात एकटी नसताना कपाटातील विविध सोन्या-चांदीचे दागिने आणि कॅश चोरी केल्याची कबुली दिली. एफआरआयमध्ये सिमा दांडे यांनी पावणेअकरा लाखांच्या मुद्देमालाची चोरीची तक्रार केली होती. मात्र ही चोरी त्यापेक्षा अधिक असल्याचे तपासात उघडकीस आले. तिच्याकडून पोलिसांनी ४ किलो २०९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ४२५ चांदीचे दागिने आणि ६० हजार रुपयांची कॅश असा २ लाख ७० हजार १७ हजार ५१५ रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दांडे कुटुंबिय बाहेरगावी असल्याचा फायदा घेऊन तिने चार महिन्यात थोडी थोडी करुन ही मालमत्ता चोरी केली होती, मात्र पवई पोलिसांनी तांत्रिक तपासासह मानवी कौशल्याचा वापर करुन या गुन्ह्यांतील संपूर्ण मालमत्ता हस्तगत करण्यात यश मिळविले. या कामगिरीबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे व त्यांच्या पोलीस पथकाचे वरिष्ठांकडून कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page