चोरीच्या उद्देशाने ८१ वर्षांच्या महिलेचा गळा आवळून लुटमार
रॉबरीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड केअरटेकरला ४८ तासांत अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ मार्च २०२४
मुंबई, – तीन दिवसांपूर्वी रॉबरीच्या उद्देशाने मलबार हिल येथे ज्योती मुकेश शाह या वयोवृद्ध महिलेची तिच्याच घरातील नोकराने गळा आवळून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच जुहू येथे अन्य एका वयोवृद्ध महिलेवर तिच्या पतीसाठी नोकरीवर ठेवलेल्या केअरटेकरने हल्ला करुन गळा आवळून सोन्याचे दागिने पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रॉबरीचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या अंकित कैलास पाटील या ३५ वर्षांच्या आरोपी केअरटेकरला जुहू पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
कुंजबाला मेहता ही ८१ वर्षांची वयोवृद्ध तिचे पती अशोक मेहता यांच्यासोबत जुहू येथील जुहू-तारा रोड, फिलोमिना अपार्टमेंटच्या तिसर्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ३०१ मध्ये राहते. तिच्या पतीने केलेल्या गुंतवणुकीवरील उत्पनावर त्यांचे उदरनिर्वाह चालते. तिची विवाहीत मुलगी निकी हेमांग रावल ही याच परिसरातील जेव्हीपीडी परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. काही दिवसांपूर्वी तिचे पती पडले होते. त्यात त्यांच्या छातीला दुखापत झाली होती. त्यामुळे ते सतत आजारी पडत होते. त्यांची देखभाल करण्यासाठी तिची मुलगी निकी व तिचे पती हेमांग मधुकर रावल यांनी बीएचएन होम हेल्थ केअर या एजनसीमार्फत अंकित पाटील याला केअरटेकर म्हणून कामाला ठेवले होते. अंकित हा नागपाड्यातील कामाठीपुरा, हाती मेंशनचा रहिवाशी आहे. १४ मार्चला सकाळी साडेसात वाजता तो नेहमीप्रमाणे कामावर आला होता. त्यानंतर तो त्याच्या कामाला लागला होता. दुपारी सव्वाच्या सुमारास त्याने बेडरुमच्या बाथरुमचे पाणी लिक होत असल्याचे सांगून कुंजबाला यांना बोलाविले होते. त्यामुळे कुंजबाला या बेडरुममध्ये आल्या होत्या. यावेळी काही कळण्यापूर्वीच अंकितने त्यांना जोरात धक्का दिला. दोन्ही हातांनी त्यांचा आवळून त्यांच्या अंगावरील सुमारे सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन तो पळून गेला होता. यावेळी तिने आरडाओरड केल्यानंतर सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने पळून जाणार्या अंकितला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला होता.
घडलेला प्रकार समजताच जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी कुंजबाला यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अंकितविरुद्ध रॉबरीचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन, सहाय्यक पोलीस आयुक्त महेश मुगुटराव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जाधव यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक प्रमोद कांबळे, तानाजी खाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रंजीत चव्हाण, गणेश जैन, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तोडणकर, पोलीस हवालदार गजानन पाटील, घाडीगावकर, सिद्धप्पा टोकरे, महागडे, खोमणे, नितीन मांडेकर, पोलीस शिपाई मलकप्पा कणमुसे, तुषार पन्हाळे, अनिल तायडे, तासगावकर यांनी पळून गेलेल्या अंकितचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना अंकित हा धोबीतलाव येथील न्यू मेट्रो गेस्ट हाऊसमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे छापा टाकून त्याला त्याला चोरीच्या दागिन्यांसह ताब्यात घेतले होते. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याला या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. त्याची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, त्याने अशाच प्रकारे अन्य काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.