मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 मार्च 2025
मुंबई, – गावदेवी परिसरातील एका नामांकित पेट क्लिनिकमध्ये बॉम्ब ठेवला असून या बॉम्बचा कुठल्याही क्षणी स्फोट होईल असा मेल आल्याने एकच खळबळ उडाली होती. या धमकीनंतर पेट क्लिनिकची संपूर्ण तपासणी केल्यानंतर बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी धमकीचा मेल पाठवून दशहतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गावदेवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.
प्रकाश बालाजी भोूेगे हे घोडबंदर रोड परिसरात राहतात. गावदेवी येथील अल्टा माऊंट रोड, गांधी हाऊसमध्ये असलेल्या ब्ल्यू सेवन वेट्स पेट क्लिनिकमध्ये ते कामाला आहेत. रविवारी या क्लिनिकमध्ये एक मेल प्राप्त झाला होता. या मेलमध्ये अज्ञात व्यक्तीने पेट क्लिनिक बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर त्यांनी ही माहिती त्यांच्या वरिष्ठांसह गावदेवी पोलिसांना दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. संपूर्ण क्लिनिक खाली केल्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकाने श्वान पथकाच्या मदतीने तिथे शोधमोहीम हाती घेतले होते.
मात्र तिथे काहीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. त्यामुळे बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे तिथे कामाला असलेल्या कर्मचार्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. याप्रकरणी तक्रारदाराच्या जबानीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बॉम्बची धमकी देऊन दहशतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या धमकीची वरिष्ठांनी गंभीर दखल स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला संमातर तपासाचे आदेश दिले आहे.