रॉबरीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस 32 वर्षांनी अटक
कन्स्ट्रक्शन साईटवर काम करताना पोलिसांची कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 मार्च 2025
मुंबई, – रॉबरीच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस पायधुनी पोलिसांनी अटक केली. इजाज शहाजहान शेख असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. जामिनावर बाहेर आल्यानंतर इजाज हा पळून गेला होता, सध्या तो एका कन्स्ट्रक्शन साईटवर काम करत होता, तिथेच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
1992 साली इजाजविरुद्ध पायधुनी पोलिसांनी 392, 397, 34 भादवी कलमातर्गत गुन्हा दाखल केला होता. त्याच्यासह त्याच्या इतर सहकार्यांनी गंभीर दुखापत रॉबरी केली होती. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयीन कोठडीत असताना त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन विशेष सेशन कोर्टाने त्याला जामिनावर सोडून दिले होते. मात्र जामिनावर बाहेर येताच तो पळून गेला होता. खटल्याच्या सुनावणीसाठी तो सतत गैरहजर राहत होता. गेल्या 32 वर्षांपासून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. मात्र तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता. त्यामुळे त्याला कोर्टाने वॉण्टेड आरोपी म्हणून घोषित करताना त्याच्याविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट जारी केले होते.
त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरु होती. ही शोधमोहीम सुरु असताना इजाज हा पायधुनीतील एका कन्स्ट्रक्शन साईटवर कामगार म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त मोहितकुमार गर्ग, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय डोळस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण देशमुख यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक नितीन पगार, तडीपार कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष रासम, सहाय्यक फौजदार परब आणि राणे यांनी बोहरी मोहल्ला, जे. जे मार्ग परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून इजाजला फेरअटक केली.
चौकशीत तो रॉबरीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याला 32 वर्षांनी अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.