लग्नाच्या आमिषाने हॉलीवूड अभिनेत्रीवर लैगिंक अत्याचार
गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या प्रियकराला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 मार्च 2025
मुंबई, – लग्नाच्या आमिषाने एका हॉलीवूड अभिनेत्रीवर लैगिंक अत्याचार करुन पळून गेलेल्या प्रियकराला अखेर बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. गुन्हा दाखल होताच आरोपी पळून गेला होता, अखेर त्याला चंदीगढ येथून अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
55 वर्षांची पिडीत महिला ही मालाड येथे राहत असून ती हॉलीवूड अभिनेत्री आहे. मॉडलिंग म्हणून करिअरची सुरुवात केल्यानंतर तिने काही हॉलीवूडसह हिंदी आणि तमिळ चित्रपटासह मालिकांमध्ये काम केले आहे. ती पोस्ट ऑपरेशनमध्ये ट्रान्सजेंडर होती. त्याचबरोबर ती एक शास्त्रीय नृत्यागंणा होती. काही महिन्यांपूर्वीच तिची सोशल मिडीयावरुन 30 वर्षांच्या आरोपीशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. सोशल मिडीयासह मोबाईलच्या माध्यमातून ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. यावेळी त्याने तो सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत असल्याचे सांगितले. जानेवारी महिन्यांत ती दिल्लीला गेली होती. तिथेच तिची भेट आरोपीशी झाली होती. याच दरम्यान त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. तिनेही त्याला होकार दिला होता. त्यानंतर त्यांच्यात अनेकदा शारीरिक संबंध आले होते. प्रत्येक वेळेस तो लग्नाचा विषय काढून तिच्याशी जवळीक निर्माण करुन शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होता.
मात्र नंतर तिने त्याला नकार दिला होता. त्यातून त्यांच्यात खटके उडू लागले आणि तो तिच्या घरातून निघून गेला होता. त्यानंतर तिने त्याला लग्नाविषयी विचारणा केली होती, मात्र तो तिला टाळण्याचा प्रयत्न करत होता. वेगवेगळे कारण सांगून तिला प्रतिसाद देत नव्हता. तिचे फोन घेत नव्हता. त्याच्याकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तिने बांगुरनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले होते.
मात्र तो चौकशीसाठी हजर राहत नव्हता. त्यामुळे त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना तो चंदीगढला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने त्याला चंदीगढ येथून ताब्यात घेतले. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केल्यांनतर कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.