घरातून गेलेल्या बारा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुली सापडल्या
छावा चित्रपट पाहून वॉटर किंगडमला गेल्याचे उघडकीस
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 मार्च 2025
मुंबई, – सांताक्रुज चौपाटी येथे फिरायला जाते असे सांगून घरातून निघून गेलेल्या बारा वर्षांच्या दोन मिसिंग अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात निर्मलनगर पोलिसांना यश आले. ताब्यात घेतल्यानंतर या दोघींनाही त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. घरातून गेल्यानंतर त्या दोघीही बोरिवली येथे गेल्या. अजंठा सिनेमागृहात छावा चित्रपट पाहिल्यानंतर दुसर्या दिवशी त्या दोघीही गोराई जेट्टी येथून वॉटर किंगडमला गेल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मौजमजा करण्याच्या उद्देशानेच त्या दोघीही घरातून निघून गेल्याचे एका वरिष्ठ अधिकार्याने बोलताना सांगितले. मिसिंग झालेल्या दोन्ही मुलींना अवघ्या आठ तासांत शोधून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केल्याने वरिष्ठांकडून निर्मलनगर पोलिसांकडून कौतुक करण्यात आले.
तक्रारदार वांद्रे येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत असून त्यांना बारा वर्षांची एक मुलगी आहे. बुधवारी सायंकाळी ही मुलगी तिच्या बारा वर्षांच्या मैत्रिणीसोबत सांताक्रुज चौपाटी येथे जात असल्याचे घरातून निघून गेल्या. मात्र रात्री उशिरापर्यंत त्या दोघीही घरी आल्या नाही. त्यामुळे त्यांच्या पालकांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने या दोन्ही मुलींचा शोध सुरु केला होता. मात्र परिसरात तसेच नातेवाईक, मित्रांकडे शोध व चौकशी करुनही या दोघींचा पत्ता सापडला नव्हता. त्या दोघीही मिसिंग झाल्याची खात्री होताच त्यांच्या नातेवाईकांनी निर्मलनगर पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीची पोलीस उपायुक्त मनिष कलवानिया यांनी गंभीर दखल घेत निर्मलनगर पोलिसांना दोन्ही मुलींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश वाघ यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सुरेखा घार्गे, पोलीस उपनिरीक्षक संतोष कोळगे, सुदर्शन बनकर, पोलीस हवालदार अमोल प्रभाकर पवार, आझिम हनीफ शेख, पोलीस शिपाई सागर नामदेव कोयंडे, प्रणव विलास तायडे, तन्मय अजीतकुमार खवळे, सागर गौतम गायकवाड यांनी दोन्ही मुलींचा शोध सुरु केला होता. त्यासाठी दोन विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती.
एका टिमने परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले. या फुटेजवरुन मुलींचा शोध घेत दुसरी टिम वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली होती. सांताक्रुज चौपाटी, खार पाईपलाईन, बदलापूर आदी ठिकाणी मुलींचा शोध घेण्यात आला, मात्र त्या सापडल्या नाही. याच दरम्यान बोरिवलीतील एका फुटेजमध्ये या मुली दिसल्या. रात्री दहा वाजता या दोघींनी अजंठा सिनेमागृहात छावा चित्रपट पाहिला. चित्रपट संपल्यानंतर त्या दोघीही सव्वाच्या सुमारास बोरिवीतील गोविंदनगर, ब्रम्हकुमारी पार्कजवळ आल्या होत्या.
दुसर्या दिवशी आठ वाजता त्या रिक्षातून बसून निघून गेल्याचे सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसले होते. त्यानंतर पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याची चौकशी केली. यावेळी त्याने त्यांना गोराई जेट्टी येथे सोडल्याचे सांगितले. तेथून त्या एसेलवर्ल्ड किंवा वॉटर किंगडम येथे गेल्याची शक्यता असल्याने पोलीस पथक तिथे रवाना झाले होते. अखेर या पथकाने गोराई पोलिसांच्या मदतीने वॉटर किंगडम येथून दोन्ही मुलींची सुखरुप सुटका केली. या दोघींना नंतर त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
तपासात केवळ मौजमजेसाठी त्या दोघीही घरातून निघून गेल्याचे उघडकीस आले. या दोघींनाही छावा चित्रपट पाहायचा होता. त्यानंतर वॉटर किंगडमला फिरायला जायचे होते, पालकांना सांगितले असते तर त्यांनी तिथे जाऊ दिले नसते. त्यामुळे घरात कोणाला काहीही न सांगता त्या दोघीही निघून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.