वरळी येथे सुपरवायझरच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक
कामावरुन काढून पेमेंट दिले नाही म्हणून रागातून हत्या
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 मार्च 2025
मुंबई, – वरळीतील कांबळेनगर एसआरए रिडेव्हलमेंट बांधकाम साईटवर सुपरवायझर म्हणून कामाला असलेल्या मोहम्मद शब्बीर अब्बास खान या 38 वर्षांच्या सुपरवायझरची त्याच्या कर्मचार्यासह दोन सहकार्यांनी तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या तिन्ही आरोपींना वरळी पोलिसांनी अटक केली आहे. सुधांशू प्रफुल्ल कांबळे आणि साहिल श्याम मराठी अशी या दोघांची नावे असून तिसरा आरोपी अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. काकांची नोकरी जाण्यामागे आणि कामाचा मोबदला म्हणून पेमेंट देण्यास विलंब झाल्याने सुधांशूने त्याच्या दोन्ही सहकार्यांच्या मदतीने ही हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. हत्येच्या याच गुन्ह्यांत ते तिघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना गुरुवारी 6 मार्चला रात्री साडेबारा वाजता वरळीतील ई मोजेस रोड, जिजामाता स्माशनभूमीमागील कांबळेनगर एसआरए रिडेव्हलमेंट साईटवर घडली. मोहम्मद इर्शाद अब्बास खान हा वरळीतील जिजामाता नगर, सुभाषनगर परिसरात राहतो. मृत मोहम्मद शब्बीर हा त्याचा भाऊ असून तो त्याच्यासोबत राहतो. मोहम्मद शब्बीर हा सध्या कांबळेनगर एसआर रिव्डेव्हलमेंट साईटवर सुपरवायझर म्हणून कामाला आहे. तिथेच सुधांधू हा त्याच्या काकासोबत कामाला होता. काही दिवसांपूर्वी त्याच्या काकांना कामावरुन काढून टाकण्यात आले होते. तसेच मोहम्मद शब्बीर सुधांशूचा पेमेंट देत नव्हता. त्यामुळे त्याला मोहम्मद शब्बीरचा राग होता. याच कारणावरुन त्यांच्यात अनेकदा खटके उडाले होते.
गुरुवारी रात्री साडेबारा वाजता याच कारणावरुन सुधांशू हा भावेश आणि साहिल यांच्यासोबत एसआरएच्या साईटवर आला होता. यावेळी त्यांच्यात पुन्हा पेमेंटवरुन वाद झाला होता. त्याच्यामुळेच त्यांच्या काकाची नोकरी गेली, त्याचा पेमेंट मिळत नसल्याचा आरोप करुन सुधांशूसह इतर दोघांनी मोहम्मद शब्बीरवर तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर ते तिघेही तेथून पळून गेले होते. हल्ल्यात मोहम्मद शब्बीर हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मोहम्मद इर्शाद याच्या तक्रारीवरुन वरळी पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल पारसकर, पोलीस उपायुक्त गणेश गावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश भालेराव, कुणाल रुपवते, सचिन पालवे, पोलीस उपनिरीक्षक किरण जाधव, अतुल कुंभार, संतोष काळे, तुषार मोरे, गुन्हे शाखेसह एटीसी पथकाने सुधांशू कांबळे, भावेश आणि साहिल मराठी या तिघांनाही पोलिसांनी अटक केली.
चौकशीत त्यांनीच मोहम्मद शब्बीरची हत्या केल्याची कबुली दिली. यातील भावेश हा अल्पवयीन असून इतर दोन्ही आरोपींना गुरुवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.