शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाने 1.45 कोटीची फसवणक

वायुसेनेच्या निवृत्त एअर कमांडरच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 मार्च 2025
मुंबई, – चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून शेअरमार्केट गुंतवणुकीच्या नावाने वायुसेनेच्या एका निवृत्त वयोवृद्ध एअर कमांडरची अज्ञात सायबर ठगांनी 1 कोटी 45 लाखांची ऑनलाईन फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार पवई परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर सेल पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. निवृत्त एअर कमांडरच्या या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत या गुन्ह्यांतील आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश सायबर सेल पोलिसांना दिले आहेत.

63 वर्षांचे तक्रारदार पवई परिसरात राहत असून जुलै 2011 रोजी भारतीय वायुसेनेतून एअर कमांडर म्हणून निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर ते एका खाजगी एव्हिऐशन कंपनीसाठी कर्मशियल पायलट म्हणून काम करतात. जानेवारी महिन्यांत ते त्यांच्या घरी व्हॉटअपवरील मॅसेज पाहत होते. यावेळी त्यांना एका व्हॉटअप ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यात आले होते. हा व्हॉटअप ग्रुपमध्ये शेअर मार्केट संबधित होता, त्यात शेअर मार्केटमधील दैनदिन माहिती दिली जात होती. त्यांच्यासह इतर अनेक सभासद ग्रुपमध्ये होते. उत्सुकता म्हणून त्यांनीही शेअर मार्केट गुंतवणुकीसंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांना ग्रुप अ‍ॅडमिन हॅरीसिंग आणि त्याचे कस्टमर सर्व्हिस मॅनेजर अरुण यांच्याकडून चांगली माहिती देण्यात आली होती. याच दरम्यान त्यांनी शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देताना त्यांना चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्यांनी त्यांना एक लिंक पाठविली होती.

ही लिंक ओपन करुन त्यांनी त्यांचे युझर आयडीसह पासवर्ड बनवून घेतले होते. त्यानंतर त्यांना शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी विविध बँक पैसे ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून शेअर खरेदीसाठी विविध बँक खात्यात 13 जानेवारी ते 27 जानेवारी 2025 या कालावधीत 1 कोटी 45 लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना आठ कोटी प्रॉफिट झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी काही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वारंवार प्रयत्नही त्यांना ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करता आली नाही. त्यामुळे अ‍ॅडमिन हॅरिसिंग आणि मॅनेजर अरुणला संपर्क साधून याबाबत तक्रार केली होती. मात्र त्यांनी विविध कारण सांगून त्यांना पैसे देण्यास टाळण्याचा प्रयत्न केला होता.

या दोघांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी त्यांच्याकडून गुंतवणुक रक्कम परत करण्यास सांगितले. मात्र त्यांनी ही रक्कम परत न करता त्यांना व्हॉटअप ग्रुपमधून बाहेर काढले होते. शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाने सायबर ठगाकडून ऑनलाईन फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी स्थानिक पोलिसांसह वांद्रे येथील सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबधित सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरु आहे. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्या बँक खात्याची माहिती काढून आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page