लाचप्रकरणी वाहतूक विभागाच्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक
दंडाची रक्कम टाळण्यासाठी लाचेची मागणी करणे महागात पडले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ मार्च २०२४
मुंबई, – दोन हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सहार वाहतूक विभागाचा पोलीस उपनिरीक्षक फ्रॉन्सिस रॉकी रेगो याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. दंडाची रक्कम टाळण्यासाठी एका चालकाकडून लाचेची मागणी करणे त्याला चांगलेच महागात पडले आहे.
फ्रॉन्सिस हा मालाडच्या म्हाडा मालवणी, इंद्रप्रस्थ सोसायटीमध्ये राहतो. तो सध्या सहार वाहतूक विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होता. यातील तक्रारदाराच्या मालकीचे दोन कार आहेत. या दोन्ही कार त्यांनी ओला कंपनीसाठी भाड्याने दिल्या होत्या. ते स्वत एक कार चालवत होते तर त्यांची दुसरी कार त्यांनी त्यांच्या मित्राला दिली होती. गुरुवारी सकाळी आठ वाजता त्यांचा मित्र ठाणे येथून एका प्रवाशाला घेऊन अंधेरीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, बिस्लरी जंक्शन येथे आला होता. यावेळी तिथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक फ्रॉन्सिस रेगो यांनी त्याला थांबविले होते. या कारच्या क्रमंाकावर अंदाजे सतरा हजार रुपयांचा दंड बाकी असल्याचे उघडकीस आले. तसेच कारची फिटनेस संपल्याने त्यांनी ती कार ताब्यात घेतली होती. दंडाची रक्कम भरल्यानंतर त्यांना कार परत मिळेल असे सांगण्यात आले होते.
दंड टाळण्यासाठी त्यांनी त्याच्याकडे दोन हजार रुपयांची मागणी केली होती. लाचेची रक्कम दिल्याशिवाय कार परत मिळणार नाही याची खात्री होताच त्यांनी लाचेची रक्कम देण्याची तयारी दर्शवून त्याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची संबंधित अधिकार्यांकडून शहानिशा करण्यात आली होती. त्यानंतर या अधिकार्यांनी दोन हजाराची लाचेची रक्कम घेताना पोलीस उपनिरीक्षक फ्रॉन्सिस रेगो यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईची माहिती मिळताच त्यांच्या सहकारी अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.