मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 मार्च 2025
मुंबई, – विक्रीसाठी क्रेडिटवर घेतलेल्या 2 कोटी 87 लाख रुपयांच्या विविध सोन्याच्या दागिन्यांचा दोन ज्वेलर्स व्यापार्यांनी अपहार करुन एका ज्वेलर्स व्यापार्याची फसवणुक केल्याचा प्रकार काळबादेवी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन्ही ज्वेलर्स व्यापार्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. एबिनझर पी पीटर आणि भास्कर अशी या दोघांची नावे असून यातील एबिनझर हा क्रिस्टीना ज्वेलर्स तर भास्कर हा हरि ज्वेलर्सचा मालक असल्याचे पोलिसांनी सांगितले. ते दोघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर व्यापार्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
चिराबाजार येथील रहिवाशी असलेले दिलीप मोतीलाल जैन यांचा सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. त्यांचा काळबादेवी येथील मल्हारवाडी, दुर्गाचैनदादी शेठ परिसरात दागिने बनविण्याचा कारखाना आहे. एबीनझर आणि भास्कर हे दोघेही त्यांच्या परिचित व्यापारी असून त्यांचा स्वतचा ज्वेलर्स दुकान आहे. अनेकदा ते या दोघांनाही सोन्याचे दागिने बनवून देत होते. दागिने दिल्यानंतर त्यांचे पेमेंट वेळेत केल्यामुळे त्यांचा या दोघांवर विश्वास होता. 20 जानेवारी ते 30 जून 2024 या कालावधीत त्यांनी दिलीप जैन यांच्याकडून 2 कोटी 87 लाख 86 हजार 113 रुपयांचे 3318 ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने क्रेडिटवर घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांना दागिन्यांचे पेमेंट केले नव्हते. विचारणा केल्यानंतर ते दोघेही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते.
विविध कारण सांगून पेमेंट देण्यास टाळाटाळ करत होते. त्यांच्याकडून घेतलेल्या सोन्याच्या दागिन्यांची परस्पर विक्री करुन त्यांनी दिलीप जैन यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी एल. टी मार्ग पोलिसात या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एबिनझर पीटर आणि भास्कर यांच्याविरुद्ध पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन दिलीप जैन यांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांना आदेश दिले आहे. या आदेशांनतर पळून गेलेल्या दोन्ही आरोपी ज्वेलर्स व्यापार्यांचा पोलीस शोध घेत आहेत.