अंधेरी येथे व्यावसायिकाची घरी 80 लाखांची घरफोडी
आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची विशेष मोहीम सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 मार्च 2025
मुंबई, – अंधेरी येथे एका व्यावसायिकाच्या घरात प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने सुमारे 80 लाखांचे विविध सोन्याचे, हिर्यांचे दागिने आणि कॅश असा मुद्देमाल चोरी करुन पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. आरोपीच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
ही घटना बुधवार 5 मार्च रात्री अकरा ते गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास अंधेरीतील लोखंडवाला, फ्लॅग हॉटेलसमोरील लायन्स सोल मार्ग, प्रिमिअर टॉवर इमारतीमध्ये घडली. याच इमारतीच्या बंगलो क्रमांक एकमध्ये अखिल अनुपेंद्र चतवैदी हे 59 वर्षीय व्यावसायिक त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांची फ्रोजोन रियल्टी लिमिटेड नावाची रियल इस्टेट, रिटेल कंपनी आहे. त्यांच्या बंगल्याच्या तळमजल्यावर किचन, ड्रायिंग रुम आणि त्यांचा एक बेडरुम आहे. पहिल्या मजल्यावर चार बेडरुम असून त्यात त्यांचा मुलगा, वयोवृद्ध आई राहते. तेथीलच बेडरुमच्या कपाटात ते त्यांचे सोन्याचे, हिर्याचे दागिने आणि कॅश ठेवतात. बुधवारी त्यांच्यासह इतर सर्व सदस्यांनी जेवण केले आणि ते सर्वजण झोपण्यासाठी त्यांच्या बेडरुममध्ये गेले होते.
रात्री उशिरा त्यांच्या घरात अज्ञात व्यक्तीने प्रवेश करुन कपाटातील विविध सोन्याचे, हिर्यांचे दागिने आणि वीस हजाराची कॅश असा 80 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. सकाळी त्यांची पत्नी बेडरुममध्ये गेली होती. यावेळी तिला आतून कडी असल्याचे दिसून आले. तिने दुसर्या चावीने दरवाजा उघडल्यानंतर तिला तिच्या घरी चोरी झाल्याचे दिसून आले. अज्ञात चोरट्याने कपाटातील सर्व सोन्याचे, हिर्यांचे दागिने आणि कॅश घेऊन पलायन केले होते. हा प्रकार लक्षात येताच तिने ओशिवरा पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी अखिल चतुवैदी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. या घरफोडीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत ओशिवरा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर तीन ते चार पथकाची नियुक्ती करण्यात आली असून या पथकाने पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.