शहरात तीन अपघातात वयोवृद्धासह तीन तरुणांचा मृत्यू
वांद्रे, जोगेश्वरी मानखुर्द येथील घटना; दोन चालकांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 मार्च 2025
मुंबई, – वांद्रे, जोगेश्वरी आणि मानखुर्द येथील तीन वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. त्यात एका वयोवृद्धासह तीन तरुणांचा समावेश आहेत. मृतांमध्ये नारायण शंकर पोतदार ऊर्फ मामा या 65 वर्षांच्या वयोवृद्धासह कुलदिपसिंह हिराजी गोहिल, मानव विनोद पटेल आणि हर्ष आशिष मकवाना यांचा समावेश आहे. याप्रकरणी खेरवाडी, ओशिवरा आणि मानखुर्द पोलिसांनी तीन स्वतंत्र सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन दोन चालकांना अटक केली तर तिसरा गुन्ह्यांतील आरोपी चालक पळून गेला आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत. धर्मेद्रकुमार अभयनाथ यादव आणि सिद्धेश रुपेश बेलकर अशी या दोन्ही चालकांचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पहिला अपघात गुरुवारी 6 मार्चला रात्री साडेनऊ वाजता जोगेश्वरीतील ओशिवरा, न्यू लिंक रोडवरील जस्ट डॉग शॉपसमोर झाला. रात्री उशिरा ओशिवरा पोलिसांचे एक विशेष पथक परिसरात गस्त घालत होते. जस्ट डॉग शॉपसमोर आल्यानंतर त्यांना नारायण पोतदार हे वयोवृद्ध जखमी अवस्थेत दिसून आले. विचारपूस केल्यानंतर त्यांनी त्यांना एका टेम्पोने धडक दिल्याचे सांगितले. अपघातात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. तपासात नारायण पोतदार हे अंधेरीतील एका हॉटेलमध्ये कामाला होते. रात्री काम करुन ते जस्ट डॉग समोरुन जात होते. यावेळी भरवेगात जाणार्या एका टेम्पोने त्यांना धडक दिली होती. हा प्रकार उघडकीस येताच टेम्पोचालक धर्मेद्रकुमार अभयनाथ यादव या 28 वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने टेम्पो चालवून एका वयोवृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला अटक करण्यात आली. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. धर्मेद्रकुमार हा मूळचा उत्तरप्रदेश त्रिभुवन पूर, बरागाव, संत रविदासनगरचा रहिवाशी असून सध्या दहिसर येथील वैशालीनगर, दयाशंकर चाळीत राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दुसर्या अपघातात कुलदिपसिंह हिराजी गोहिल या तरुणाचा मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचालक पळून गेला असून त्याचा मानखुर्द पोलीस शोध घेत आहेत. मुकेशभाई राजाभाई चौधरी हा 23 वर्षांचा तरुण विक्रोळी येथे राहत असून एका कपड्याच्या दुकानात कामाला आहे. बुधवारी 5 मार्चला त्याचा मित्र कुलदिपसिंहला वाशी येथे जायचे होते. तसेच तो स्वत पुण्याला जाणार होता. त्यामुळे तो त्याचा मित्र कुलदिपसिंह याच्यासोबत त्याच्य अॅक्टिव्हा बाईकने विक्रोळी येथून वाशीने निघाला होता. ही बाईक मानखुर्द-वाशी हायवे रोडने जात असताना मागून आलेल्या एका डंपरने त्यांच्या बाईकला धडक दिली होती. त्यात मुकेशभाई आणि कुलदिपसिंह हे दोघेही जखमी झाले होते. जखमी झालेल्या या दोघांनाही राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे कुलदिपसिंहला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर त्याच्यावर तिथे उपचार सुरु करण्यात आले होते. अपघाताची माहिती मिळताच मानखुर्द पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मुकेशभाई चौधरी याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. अपघातानंतर तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
तिसर्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना वांद्रे परिसरात घडली. मृतांमध्ये मानव विनोद पटेल आणि हर्ष आशिष मकवाना यांचा समावेश असून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या सिद्धेश रुपेश बेलकर याला खेरवाडी पोलिसांनी अटक केली आहे. हा अपघात शुक्रवारी एक वाजता वांद्रे येथील खेरवाडी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, वाकोला ब्रिजजवळील उत्तर वाहिनीवर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. विनोद बाबू पटेल हे विलेपार्ले येथे राहत असून चालक म्हणून काम करतात. 21 वर्षांचा मानव हा त्यांचा मुलगा तर हर्ष (20) हा मुलाचा मित्र आहे. शुक्रवारी रात्री ते दोघेही त्यांच्या स्कूटीवरुन जात होते. यावेळी भरवेगात जाणार्या एका कारने त्यांना धडक दिली होती. त्यात मानव आणि हर्ष हे दोघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यांना कूपर आणि व्ही. एन देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातानंतर खेरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कारचालक रुपेश बेलकर याला अटक केली.