क्रेडिटवर घेतलेल्या 48.78 लाखांच्या हिर्यांचा अपहार
व्यापार्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 मार्च 2025
मुंबई, – क्रेडिटवर घेतलेल्या 48 लाख 78 हजार रुपयांच्या हिर्यांचा अपहार करुन एका हिरे व्यापार्याची फसवणुक झाल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी रुपेश रामसजीवन सोनी या हिरे व्यापार्याविरुद्ध बीकेसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या रुपेशचा पोलिसांकडून शोध सुरु असून त्याच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
रसीकभाई भिमजीभाई देसाई हे हिरे व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाड परिसरात राहतात. त्यांची बंधन एक्सपोर्ट नावाची हिरे खरेदी-विक्री करणारी एक खाजगी कंपनी आहे. त्यात त्यांच्यासह सुधाबेन रसीकभाई देसाई, हसमुखभाई वालजीभाई काकडिया आणि प्रविणभाई वालजीभाई काकडिया हे पार्टनर आहेत. त्यांच्या कंपनीचे एक कार्यालय वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्समध्ये आहे. त्यांची सुरत येथे शाखा असून तिथे हिर्यांना पॉलिश करण्याचे काम चालते. त्यांचा ग्यानचंद बंब हा मित्र असून तेदेखील हिरे व्यापारी आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून ते एकमेकांच्या परिचित असल्याने तसेच त्यांच्यात अनेकदा हिर्यांचा हिरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय झाला होता, त्यामुळे ग्यानचंदवर त्यांचा प्रचंड विश्वास होता. त्यांना व्यवसायात प्रचंड नुकसान झाले होते, त्यामुळे ते सध्या हिरे दलालीचे काम करतात.
गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यांत ते रुपेश सोनीसोबत त्यांच्या कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी रुपेश हा हिरे व्यापारी असून त्याची एम. एल कन्हैयालाल ज्वेल्स नावाची एक कंपनी असल्याचे सांगितले. त्याच्याकडे हिरे खरेदी करणारे चांगले ग्राहक आहेत. त्यामुळे त्याच्यासोबत व्यवहार केल्यास त्यांना चांगला फायदा होईल असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी रुपेश सोनीसोबत व्यवहार सुरु केला होता. त्याच्या मागणीनुसार त्यांनी त्याला 8 ऑक्टोंबर ते 9 ऑक्टोंबर 2024 या दोन दिवसांत 90.93 कॅरेटचे 48 लाख 79 हजार रुपयांचे हिरे क्रेडिटवर दिले होते. या हिर्यांचे पेमेंट सात दिवसांत देण्याचे तसेच विक्री न झालेले हिरे कार्यालयात जमा करण्याचे त्याने आश्वासन दिले होते. मात्र बरेच दिवस उलटूनही त्याने हिरे किंवा पेमेंट केले नव्हते. त्यामुळे त्यांनी रुपेशला कॉल केला होता, मात्र त्याचा मोबाईल बंद येत होता. वारंवार कॉल करुनही त्याचा संपर्क होऊ शकला नाही.
रुपेशने क्रेडिटवर घेतलेल्या हिर्यांचा अपहार करुन फसवणुक केल्याचे लक्षात येताच त्यांनी बीकेसी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रुपेश सोनीविरुद्ध पोलिसांनी हिर्यांचा अपहार करुन रसीकभाई देसाई या हिरे व्यापार्याची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. रुपेश हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे. रुपेशने अशाच प्रकारे इतर हिरे व्यापार्यांची फसवणुक केल्याचे बोलले जाते. त्याचाही पोलीस तपास करत आहेत.