हॉटेलमध्ये 41 वर्षांच्या व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या
पत्नीसह मावशीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 मार्च 2025
मुंबई, – विलेपार्ले येथील नामांकित हॉटेलमध्ये निशांत सुमनराज त्रिपाठी नावाच्या एका 41 वर्षांच्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पत्नी आणि तिच्या मावशीच्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या दोघींविरुद्ध विमानतळ पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अपूर्वा अनिल पारिक आणि प्रार्थना मिश्रा सत्यप्रकाश आर्या अशी या दोघींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. निशांतकडे पोलिसांना एक सुसायट नोट सापडले असून त्यात त्याने या दोघींच त्याच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या दोघींची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
निलम सुमनराज त्रिपाठी ही 64 वर्षांची वयोवृद्ध महिला मूळची उत्तरप्रदेशच्या कानपूरची रहिवाशी असून सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करते. निशांत हा तिचा मुलगा असून त्याने 28 फेब्रुवारी 2025 रोजी विलेपार्ले येथील एका नामांकित हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शवविच्छेदनानंतर त्याच्या पार्थिवावर सांताक्रुज येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या घटनेनंतर निशांतच्या मोबाईलच्या वेबसाईटवर एक मॅसेज तिच्या निदर्शनास आला होता. हा मॅसेज निशांतने त्याची पत्नी अपूर्वा हिच्यासाठी लिहिला होता. त्यात त्याने त्याचे अपूर्वावर खूप प्रेम असल्याचे सांगून तिला कधीच काही कमी पडू दिले नाही. मात्र मी आज ज्या संघर्षातून जात आहे. त्याला आणि माझ्या आत्महत्येला तुझ्यासह तुझी मावशी प्रार्थना मिश्रा हेच जबाबदार आहे. म्हणून तुला विनंती करतो की आता तिच्याकडे जाऊ नकोस असे नमूद केले होते.
हा मॅसेज निलम त्रिपाठी यांनी विमानतळ पोलिसांना दाखवून तिच्या मुलाच्या आत्महत्येला त्याची पत्नी अपूर्वा आणि मावशी प्रार्थना हेच जबाबदार असल्याचा आरोप करुन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अपूर्वा पारिक आणि प्रार्थना मिश्रा या दोघींविरुद्ध निशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघींची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
प्राथमिक तपासात निशांत हा अंधेरीतील वर्सोवा परिसरात राहत होता. गेल्या आठवड्यात त्याने विलेपार्ले येथील एका हॉटेलमध्ये रुम बुक केला होता. यावेळी त्याने डीएनडीची पाटी लावली होती. तीन दिवस तो त्याच्या रुममधून बाहेर आला नव्हता. त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. हा प्रकार संशयास्पद वाटताच हॉटेलच्या कर्मचार्यांनी विमानतळ पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दुसर्या चावीने दरवाजा उघडून पोलिसांनी आत प्रवेश केला असता निशांतने रुममध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. शवविच्छेदनानंतर 2 मार्चला त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांना सोपविण्यात आला होता. याच दरम्यान त्याच्या कंपनीच्या वेबसाईटवर त्याने ऑपरेट केलेली सुसायट नोट त्याच्या आईसह बहिणीच्या निदर्शनास आली होती असे पोलिसांनी सांगितले.