रुग्णालयातील पेशंटकडून आलेल्या पैशांवर मोलकरणीचा डल्ला
साफसफाई करताना वीस लाखांच्या कॅशवर हातसफाई केली
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ मार्च २०२४
मुंबई, – रुग्णालयातून पेंशट तपासणीसह सर्जरी आणि इंडोअर ऍडमिशनचे जमा केलेल्या पैशांवर घरातील मोलकरणीनेच डल्ला मारल्याची घटना मालाड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी स्नेहल रतन लोहार या महिलेविरुद्ध दिडोंशी पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या स्नेहलचा शोध सुरु केला आहे. घरातील साफसफाई करताना तिने सुमारे वीस लाखांच्या कॅशवर हातसफाई केल्याने तक्रारदार डॉक्टर दाम्पत्यांना धक्काच बसला आहे.
व्यवसायाने डॉक्टर असलेले अनिल नंदलाल सूचक हे मालाड येथील प्लॉट क्रमांक १८६, अशोक कुटीर अपार्टमेंटमध्ये त्यांची पत्नी आभा, मुलगा सुरज आणि सून सलोनीसोबत राहतात. त्याची पत्नी, मुलगा आणि सून हे तिघेही डॉक्टर आहेत. त्यांच्या अपार्टमेंटमध्ये त्यांच्या मालकीचे सूचक नावाचे एक मल्टिस्पेशलिटी रुग्णालय आहे. त्यांच्या पत्नीकडे रुग्णालयाच्या सर्व व्यवहाराची जबाबदारी आहे. ते दिवसभर रुग्णालयातील देखरेख करणे, पेशंट तपासणे, सर्जरी करणे आदी कामात व्यस्त असतात. रात्री आठ वाजता ते सर्वजण त्यांच्या घरी जातात. त्यांनी त्यांच्या घरी साफसफाई, जेवण आणि इतर कामासाठी त्यांनी दोन महिलांना कामावर ठेवले होते. त्यात स्नेहल लोहार हिचा समावेश होता. ती विरार येथे राहत असून सूचक यांच्याकडे गेल्या आठ वर्षांपासून कामाला आहे. त्यामुळे तिच्यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता. त्यांच्या रुग्णालयात सर्जरी, ओपीडी पेंशट, डायलिसीस, सोनोग्राफी, एक्सरे युनिट असून जवळपास ५० हून पेशंटची ऍडमिट होण्याची सोय आहे. अनेकदा रुग्णालयात बाहेरील डॉक्टर येत असल्याने तिथे कामाचा प्रचंड लोड होता. २०२२ पासून रुग्णालयाच्या उत्पनातून त्यांनी सुमारे २० लाख रुपयांची कॅश बाजूला काढून ठेवली होती. ही कॅश त्यांनी त्यांच्या घरातील लॉकरमध्ये ठेवली होती. भविष्यात ही कॅश कामाला येण्याची शक्यता असल्याने त्यांनी ही रक्कम खर्च न करण्याचा निर्णय घेतला होता.
९ मार्चला त्यांना पैशांची तातडीने गरज होती. त्यामुळे त्यांच्या पत्नीने लॉकरमधून कॅश काढण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी तिला वीस लाख रुपयांची कॅश गायब असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी ही माहिती त्यांच्या पतीला सांगितली होती. या चोरीमागे त्यांचा स्नेहलवर संशय होता. दिवसभर ती घरी असते, तसेच तिला घरातील सर्व रुममध्ये साफसफाईची मुभा होती. या घटनेनंतर त्यांनी तिची चौकशी सुरु केली होती. त्यात स्नेहलने अलीकडेच्या काळात प्रचंड खर्च केल्याचे तसेच विरार येथे एक फ्लॅट विकत घेतल्याचे त्यांना समजले होते. त्यामुळे तिनेच घरातील सफाई करताना लॉकरमधील कॅशवर डल्ला मारला असावा असा त्यांचा संशय होता. या घटनेनंतर डॉ. अनिल सूचक यांनी दिडोंशी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार करताना या चोरीमागे स्नेहल लोहार हिच्यावर संशय व्यक्त केला होता. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून स्नेहलचा पोलीस शोध घेत आहेत. या वृत्ताला दिडोंशी पोलिसांनी दुजोरा देताना अद्याप मोलकरणीला अटक झाली नसल्याचे सांगितले.