मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 मार्च 2025
मुंबई, – हवालामार्फत सुरु असलेल्या सोने तस्करीच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने अटक केली. ईश्वरसिंग राठोड असे आरोपीचे नाव असून अटकेच्या भीतीने तो गेल्या महिन्यांपासून वापी येथे लपून होता असे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गेल्या वर्षी सोने तस्करीच्या एका टोळीचा डीआरआयच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला होता. याच गुन्ह्यांत या अधिकार्यांनी मुंबई सेंट्रल येथील एका नामांकित अपार्टमेंटमध्ये सापळा लावून दोन महिलांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्यांना सुमारे सतरा कोटीचे सोने सापडले होते. या दोन्ही महिलांच्या चौकशीतून त्या दोघीही सोने तस्करीच्या एका टोळीशी संबंधित असल्याचे उघडकीस आले होते. त्यांच्या चौकशीतून त्यांच्या इतर सहकार्यांना या अधिकार्यांनी अटक केली होती. याच दरम्यान या टोळीतील मुख्य आरोपींची माहिती डीआरआयला प्राप्त झाली होती. त्यानंतर या आरोपीला अटक करुन त्याच्याकडून या अधिकार्यांनी चार किलो सोने जप्त केली होती. त्याने ते सोने ईश्वर राठोड याच्या पाठविले होते.
याच गुन्ह्यांत नंतर इतर तिघांना या अधिकार्यांनी अटक केली होती. मात्र ईश्वर राठोड हा पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. त्याच्या अटकेसाठी या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना ईश्वर हा गेल्या काही महिन्यांपासून वापी येथे लपला असल्याची माहिती या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकार्यांनी त्याला वापी येथील एका फ्लॅटमधून अटक केली. तो सोने तस्करी करणार्या टोळीचा मुख्य सहकारी आहेत.
हवालमार्फत सोने तस्करीमागे त्याची महत्त्वाची भूमिका होती. त्याच्या राहत्या घरात सोने आणि पैसे ठेवले जात होते. सहकार्यांच्या अटकेने तो घाबरला होता. त्यामुळे तो पळून गेला होता. अटकेच्या भीतीने तो गेल्या काही महिन्यांपासून वापी येथे वास्तव्यास होता. मात्र वॉण्टेड असलेल्या ईश्वर राठोडला अखेर या अधिकार्यांनी अटक केली. त्याच्या अटकेने या गुन्ह्यांत अटक झालेल्या आरोपींची संख्या आठ झाली आहे.