मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 मार्च 2025
मुंबई, – गॅस वाहिनीतून गॅस लिकेज होऊन आग लागून तीनजण भाजले. त्यापैकी दोनजण गंभीर भाजले असून त्यांच्यावर जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. अमन हरिशंकर सरोज, अरविंद चौतराम कैथाम आणि सुरेश कैलास गुप्ता अशी या तिघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगतले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी जेसीबी चालक आणि संबंधित कॉन्ट्रक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे.
अंधेरीतील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेरे-ए-पंजाब जंक्शनजवळ रविवारी सकाळी अचानक आग लागली होती. तिथे रॉडचे काम सुरु होते. त्यासाठी एक खड्डा खोदण्यात आला होता. त्याच्या बाजूलाच महानगर गॅसची एक लाईन होती. त्या लाईनच्या बाजूला काही विजेच्या तारा होत्या. खड्यातून अचानक गॅस लिकेज झाला आणि तिथे आग लागली होती. यावेळी रस्त्यावरुन एक स्कूटर, रिक्षा आणि कार जात होते. आगीमुळे या तिन्ही वाहनांनी पेट घेतली आणि आगीत तिन्ही वाहने पूर्ण भस्मसात झाली होती. यावेळी तिथे असलेल्या इतर दोन कार आगीत पूर्णपणे भस्मसात झाल्या होत्या.
आगीची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी आगीत भाजलेल्या तिघांना पोलिसांनी तातडीने जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यापैकी अमन सरोज आणि अरविंद कैथाम यांना गंभीर तर सुरेश गुप्ता याला किरकोळ दुखापत झाली होती. या तिघांवर तिथे उपचार सुरु आहेत. याप्रकरणी जेसीबी चालकासह संबंधित कॉन्ट्रक्टरविरुद्ध पोलिसांनी हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
प्राथमिक तपासात या ठिकाणी रस्त्याचे काम सुरु होते. जेसीबी चालक हा कोणासाठी काम करत होता याचा उलघडा होऊ शकला नाही. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलासह महानगर गॅस कर्मचार्यांनी तातडीने ही आग विझविली होती. त्यामुळे पुढील अनर्थ टळल्याचे पोलिसांनी सांगितले.