बँकेच्या वरिष्ठ अधिकार्यांची फसवणुप्रकरणी गुन्हा दाखल
बारा टक्के व्याजदारावर परताव्याच्या आमिषाने गंडा घातला
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 मार्च 2025
मुंबई, – व्यवसायात गुंतवणुक केल्यास बारा टक्के व्याजदराने परतावा देण्याचे आमिष दाखवून अंधेरीतील एका बँकेच्या वरिष्ठ अधिकार्याने त्याच्याच मित्राने सुमारे 75 लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जालोंगी रिटेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या दोन संचालक पती-पत्नीविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी अपहारासह फसवणुक आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दिपंकर सुरेश हलदर आणि अंजना दिपंकर हलदर अशी या दोघांची नावे असून ते दोघेही हरियाणाच्या गुडगाव, गुरुग्रामचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांनी गुंतवणुकीच्या नावाने अनेकांची फसवणुक केल्याचे बोलले जाते. त्यामुळे फसवणुक झालेल्या गुंतवणुकदारांनी ओशिवरा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
कौशिक बिमानरॉय चौधरी हे त्यांच्या कुटुंबियांसोबत अंधेरीतील लोखंडवाला, मिल्लतनगर परिसरात राहतात. सध्या ते एका खाजगी बँकेत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी गुजरातच्या अहमदाबाद शहरात इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला होता. तिथेच त्यांची हरियाणाचा रहिवाशी असलेला दिपंकर हलदरशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. डिसेंबर 2018 रोजी दिपंकरने त्यांना कॉल करुन त्याने स्वतची एक खाजगी कंपनी सुरु केली असून या कंपनीचे कार्यालय गुडगाव, कोलकाता, मुंबई आणि हैद्राबाद येथे आहेत. याच कंपनीत दिपंकरसह त्याची पत्नी अंजना ही संचालक म्हणून काम करत होते.
ही कंपनी होलसेलमध्ये मासे खरेदी करुन त्यावर प्रक्रिया करुन ते मासे रिटेलमध्ये मार्केटमध्ये विकते. त्यासाठी सरकारला कुठलाही जीएसटी किवा टॅक्स भरावा लागत नाही. या व्यवसायात प्रचंड फायदा असून त्यात त्याने गुंतवणुक करावी. या गुंतवणुकीवर त्यांना बारा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखलिे होते. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्याने त्याच्या कंपनीची सविस्तर माहिती दिली होती. त्यात दिपंकरला 25 वर्षांचा मार्केटिंगचा व्यवसायाचा अनुभव असल्याचे तसेच कंपनीतून त्याला चांगला फायदा होत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यांनी त्याच्या गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता.
मार्च 2020 रोजी त्यांची एक मिटींग झाली होती. या मिटींगमध्ये त्यांच्यात एक करार झाला होता. ठरल्याप्रमाणे कौशिक चौधरी यांनी टप्याटप्याने त्याच्या कंपनीत 75 लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना दोन वर्षांनी बारा टक्के व्याजादराने परतावा मिळणार होता. मात्र दोन वर्ष उलटूनही त्याने त्यांना परताव्याची रक्कम दिली नाही. विचारणा केल्यानंतर दिपंकर त्यांना आज उद्या देतो असे सांगून टाळाटाळ करत होता. नंतर त्याने त्यांचे कॉल घेणे बंद केले होते. त्यांच्या मॅसेजला उत्तर देणे टाळण्याचा प्रयत्न करत होता. चौकशीदरम्यान दिपंकरने व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाने अनेकांना प्रवृत्त केले होते, आकर्षक परतावा देतो असे सांगून कोणालाही मूळ रक्कमेसह परतावा रक्कम दिली नव्हती.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच कौशिक चौधरी यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यांत दिपंकर व त्याची पत्नी अंजना या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची ओशिवरा पोलिसांकडून शहानिशा करण्यात आली होती. त्यात या दोघांनी अनेकांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.