मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 मार्च 2025
मुंबई, – बदलापूरची घटना ताजी असताना सायन येथील एका खाजगी शाळेच्या बसचालकाने बारा वर्षांच्या अल्पवयीन शाळकरी मुलीवर तब्बल आठ महिने बसमध्ये अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे बळीत मुलीच्या आईने शाळा प्रशासनाकडे तक्रार करुनही त्याच्याविरुद्ध काहीच कारवाई करण्यात आली नाही. अखेर बळीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन शाळेच्या बसचालकासह मुख्याधापकाविरुद्ध सायन पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. यातील बसचालक सध्या पोलीस कोठडीत आहे तर शाळेच्या मुख्याधापकाला नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या घटनेने शाळेतील शिक्षकासह पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
33 वर्षांची तक्रारदार महिला ही धारावी परिसरात राहते. तिला बारा वर्षांची एक मुलगी असून ती सायन येथील एका खाजगी शाळेत शिकते. काही विद्यार्थ्यांना शाळेतून घरी आणि घरातून शाळेत आणण्यासाठी शाळेने एक बस ठेवली होती. याच बसमधून ती शाळेत जात होती आणि शाळा सुटल्यानंतर त्याच बसमधून घरी जात होती. याच बसमध्ये आरोपी चालक म्हणून कामाला आहे. ऑगस्ट 2024 रोजी ही मुलगी शाळेच्या बसमधून प्रवास करताना आरोपी तिच्याशी थट्टामस्करीत वारंवार अश्लील आणि नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग करत होता. सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र नंतर तो तिच्या ड्रेससह टी शर्टमध्ये हात घालून तिच्या छातीवरुन हात फिरवून तिच्याशी अश्लील चाळे करु लागला होता. ती मागे बसली तर तिला पुढे त्याच्या शेजारी बसवून तिच्याशी अश्लील चाळे करत होता.
सतत तिच्या कमरेला, छातीला आणि पायांना अश्लील स्पर्श करुन चिमटा काढत होता. तिचा भाऊ तिच्या बाजूला बसल्यानतर तो तिला बाहेर काहीतरी दाखविण्याचा प्रयत्न करुन गैरवर्तन करत होता. भीतीपोटी तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. मात्र त्याच्यात काहीच सुधारणा नव्हती. दररोज शाळेत जाताना आणि शाळेतून येताना तो तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग करत होता. सतत होणार्या या प्रकारामुळे ही मुलगी प्रचंड घाबरली होती. अनेकदा ती शाळेत जाण्यास टाळाटाळ करु लागली होती. हा प्रकार तिच्या आईला संशयास्पद वाटला होता. त्यामुळे तिने तिच्याकडे विचारणा केली होती. तिच्याकडून घडलेला प्रकार समजताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता.
सोमवारी 3 मार्चला तिने शाळेत जाऊन मुख्याधापकांना घडलेला प्रकार सांगून आरोपी बसच्या चालकाविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली होती. मात्र या तक्रारीनंतर शाळा प्रशासनाने किंवा मुख्याधापकाने आरोपी बसचालकाविरुद्ध काहीच कारवाई केली नव्हती. त्यामुळे तिने सायन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना हा प्रकार सांगून आरोपी बसचालकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर बसचालकासह शाळेचे मुख्याधापक अशा दोघांविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर बसचालकाला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी मुख्याधापकाला नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. आरोपी बसचालक सायन-कोळीवाडा परिसरात राहत असून त्याने बळीत मुलीशी 10 ऑगस्ट 2024 ते 10 मार्च 2025 या कालावधीत अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याचे तपासात उघडकीस आला आहे.
आरोपी बसचालकाविरुद्ध धारावी पोलीस ठाण्यात एका गुन्ह्यांची नोंद आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना त्यालाद शाळेच्या बसमध्ये चालक म्हणून कामाला ठेवण्यात आले होते. त्याने बळीत मुलीसह इतर काही मुलींशी गैरवर्तन केले आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.