जुन्या वादातून 22 वर्षांच्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या
हत्येनंतर पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 मार्च 2025
मुंबई, – जुन्या वादातून विघ्नेश नारायण चांदले या 22 वर्षांच्या तरुणाची त्याच्याच परिचित आरोपी मित्रांनी चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना चेंबूर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना आरसीएफ पोलिसांनी अटक केली आहे. सुमीत कमलेश आंबोरे आणि ओमकार सुनिल मोरे अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना रविवारी रात्री उशिरा सव्वाबारा वाजता चेंबूर येथील वाढवली गाव, जरीमरी माता मंदिराजवळ घडली. प्रथमेश नारायण चांदले हा चेंबूरच्या डॉ. सी. जी किडवाई रोड, जरीमरी माता मंदिराजवळील चांदले हाऊस, रुम क्रमांक 122 मध्ये राहत असून मृत विघ्नेश हा त्याचा लहान भाऊ आहे. याच परिसरात सुमीत आंबोरे आणि ओमकार मोरे हे दोघेही राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. त्याचा त्यांच्या मनात राग होता. त्यातून त्यांनी चांदले बंधूंना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती.
रविवारी रात्री उशिरा सव्वाबारा वाजता विघ्नेश हा जरीमरी माता मंदिराजवळ होता. यावेळी तिथे ओमकार आणि सुमीत आले. त्यांनी जुना वाद काढून विघ्नेशला पुन्हा शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यानंतर काही कळण्यापूर्वीच या दोघांनी त्यांच्याकडील चाकूने विघ्नेशच्या छातीत वार केले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. हल्ल्यानंतर ते दोघेही पळून गेले होते. जखमी झालेल्या विघ्नेशला स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच आरसीएफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी प्रथमेश चांदले याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सुमीत आणि ओमकार यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. हत्येनंतर ते दोघेही पळून गेले होते, त्यामुळे त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना या दोघांनाही सोमवारी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.