मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ मार्च २०२४
मुंबई, – गुप्तदान केलेल्या सुमारे ३६ लाख रुपयांच्या देणगीच्या संस्थेच्याच अकाऊंटटने अपहार केल्याची धक्कादायक घटना माटुंगा परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी प्रतिक नवनीतलाल शहा या अकाऊंटविरुद्ध शीव पोलिसांनी अपहाराचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु केला आहे.
प्रणव प्रमोद तेजुकाया हे व्यावसायिक असून माटुंगा येथील डॉ. बी. ए रोड, तेजुकाया पार्क परिसरात राहतात. सायन येथील मानव सेवा संघ अनाथाश्रम या संस्थेचे ते ट्रस्टी असून संस्थेची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे. या संस्थेत लहान मुलापासून वयोवृद्धांची देखभाल केली जाते. काही लोकांकडून त्यांच्या संस्थेला देणगी दिली जाते. ही देणगी कॅश व धनादेशद्वारे दिली जात असल्याने देणगी देणार्या व्यक्तीला नंतर संस्थेतर्फे पावती दिली जाते. त्याचे सर्व रेकॉर्ड ठेवले जात असून त्यात अफरातफर होणार नाही याची ते स्वत कटाक्षाने लक्ष देतात. अनेकदा त्यांना देणगीदार स्वतचे नाव न सांगता गुप्तदान देतात. संस्थेत अशा देणगीदाराच्या नावाची नोंद वेलविशर अशी केली जाते. त्यांच्याकडे प्रतिक शहा हा अकाऊंटट म्हणून कामाला होता. संस्थेला मिळालेली देणगी आणि त्यातून शिल्लक राहिली देणगी बँक खात्यात जमा करण्याची त्याच्यावर जबाबदारी होती. बँक खात्यात ही रक्कम जमा होईपर्यंत मिटींग रुमच्या तिजोरीमध्ये ती कॅश ठेवली जात होती. याच रक्कमेचा वापर लहान मुलांच्या शिक्षणासह डागडुजी व इतर कामासाठी केला जात होता.
भाईंदरच्या ओल्ड धरमकाथा, रविराज रेसीडन्सीमध्ये राहणारा प्रतिक हा ५ मार्चपासून अचानक कामावर येणे बंद झाला होता. याबाबत संस्थेच्या कर्मचार्यासह व्यवस्थापकाने त्याला संपर्क साधून विचारणा केली होती. मात्र त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. १४ मार्चला व्यवस्थापक पारुल शेठ हिने तिजोरीची काही कॅश काढण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी तिला काही रक्कम गायब असल्याचे दिसून आले. १ डिसेंबर २०२३ ते २२ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत सतरा देणगीदारांनी संस्थेला ३६ लाख ७७ हजार ७२० रुपयांचे गुप्तदान दिले होते. त्यापैकी ३६ लाख २९ हजार १४० रुपयांची रक्कम तिजोरीत मिळून आली नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने मिटींग रुमच्या सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती. यावेळी तिला प्रतिक शहा हा तिजोरीतून पैसे काढून एका बॅगेत भरत असल्याचे दिसून आले. संस्थेला देण्यात आलेल्या देणगीचा प्रतिकने अपहार केल्याचे निदर्शनास येताच तिने हा प्रकार संस्थेचे ट्रस्टी प्रणव तेजुकाया यांना सांगितली होती.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी संस्थेच्या वतीने शीव पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रतिक शहाविरुद्ध अपहाराचा गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच प्रतिकची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीत त्याचा सहभाग उघडकीस आल्यास त्याच्यावर अटकेची कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.