38 दिवसांच्या मुलाच्या अपहरणप्रकरणी चौघांना अटक
अपहरण केलेल्या मुलाच्या पाच लाखांमध्ये विक्रीचा प्रयत्न
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 मार्च 2025
मुंबई, – आईसोबत फुटपाथवर झोपलेल्या एका 38 दिवसांच्या नवजात मुलाचे अपहरण करुन विक्रीचा प्रयत्नात असलेल्या एका टोळीचा वनराई पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी दोन महिलांसह चौघांना मालाडच्या मालवणी परिसरातून अटक केली. राजू भानूदास मोरे, मंगल राजू मोरे, फातिमा जिलानी शेख आणि मोहम्मद आसिफ मोहम्मद उमर खान अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर या चौघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींच्या तावडीतून पोलिसांनी अपहरण केलेल्या मुलाची सुटका करुन त्याचा ताबा त्याच्या पालकाला सोपविला आहे. अपहरण केलेल्या मुलाच्या खरेदी-विक्रीचा सौदा पाच लाखांमध्ये ठरला होता. मात्र मुलाची विक्री करण्यापूर्वीच या चौघांनाही अटक करण्यात पोलिसांना यश आले.
सुरेश सलाट हे त्यांची पत्नी सोनी व 38 दिवसांच्या मुलासोबत वसई परिसरात राहतात. त्यांचा चादरी विक्रीचा व्यवसाय असून ते घराघरात जाऊन चादरी विक्री करतात. 1 मार्चला सुरेश हे त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत गोरेगाव परिसरात चादरी विक्रीसाठी आले होते. रात्री उशिर झाल्याने त्यांना वसईला घरी जाण्यासाठी रेल्वे मिळाली नव्हती. त्यामुळे ते कुटुंबिय गोरेगाव येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या बाजूलाच असलेल्या बसस्टॉपजवळील फुटपाथवर झोपले होते. रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मुलाचे अपहरण करुन पलायन केले होते. हा प्रकार नंतर सुरेश आणि सोनी यांच्या लक्षात येताच त्यांनी सर्वत्र त्यांच्या मुलाचा शोध घेतला, मात्र त्यांना त्यांचा मुलगा कुठेच सापडला नाही. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार वनराई पोलिसांना सांगून त्यांच्या मुलाचा शोधून काढण्याची विनंती केली होती.
या घटनेची पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी गंभीर दखल घेत वनराई पोलिसांना गुन्हा नोंदवून तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून मुलाचा शोध सुरु केला होता. त्यासाठी झोन बाराच्या सर्वच पोलीस ठाण्यातील निवडक पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांचे विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आले होते. या पथकाने अकरा हजाराहून सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केली होती. काही रिक्षाचालकांची चौकशी केली होती. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन या पथकाने मालवणी परिसरात मुलाचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना राजू मोरे, मंगले मोरे, फातिमा शेख आणि मोहम्मद आसिफ या चौघांना संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यांनीच या मुलाचे अपहरण केले होते. अपहरणानंतर ही टोळी या मुलाची विक्री करणार होती. मात्र मुलाच्या विक्री करण्यापूर्वीच या टोळीचा पर्दाफाश करुन चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली. चोकशीत राजू हा रिक्षाचालक, मंगल हाऊसकिपिंग तर मोहम्मद आसिफ प्लंबर म्हणून काम करत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्या तावडीतून मुलाची सुखरुप सुटका करण्यात आली असून त्याला त्याच्या पालकांकडे सोपविण्यता आले आहे.
अटकेनंतर या चौघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी चौघांनाही कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या चौघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का, या गुन्ह्यांत त्यांना इतर कोणी मदत केली आहे का, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत. मुलगा सुखरुप सापडल्याने सुरेश आणि सोनी सलाट यांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय ढोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र पोस्टुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण तुषारे, पोलीस उपनिरीक्षक भिसे, वणवे, तळेकर, अजीत देसाई, पडवळ, पोलीस हवालदार मिसाळ, पालवे, धनू, पोलीस शिपाई पाटील, तांत्रिक मदत पोलीस हवालदार सागर पवार, खाजगी व्यक्ती परेश मास्टर यांनी केली.