मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 मार्च 2025
मिरा-भाईंदर-वसई-विरार, – घरफोडीच्या गुन्ह्यांतील एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. शाम चिनाप्पा धोत्रे असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचा बहुतांश मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी नालासोपारा पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.
यातील तक्रारदार नालासोपारा येथे राहतात. 1 मार्चला ते 6 मार्च 2025 या कालावधीत ते बाहेरगावी गेले होते. यावेळी त्यांच्या घरात कोणीही नव्हते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कडीकोयंडा उचकटून प्रवेश केला होता. त्यानंतर कपाटातील सुमारे तीन लाखांचे विविध सोन्याचे दागिने चोरी करुन पलायन केले होते. 6 मार्चला सकाळी नऊ वाजता ते घरी आले असता त्यांना त्यांच्या घरी चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी नालासोपारा पोलिसांना ही माहिती देऊन अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरु केला होता. या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत होते. हा तपास सुरु असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते.
या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, पोलीस हवालदार मुकेश तटकरे, रमेश आलदर, सागर बारवकर, प्रशांत पाटील, अमोल कोरे, राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमीत जाधव, आतिश पवार, तुषार दळवी, मनोहर तारडे, मसुब प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनावणे यांनी शाम धोत्रे याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी दोन लाख सहा हजार रुपयांचे चोरीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
शाम हा विरार येथील साईनाथ नगर, जीत अपार्टमेंटमध्ये राहत असून पेटींगचे काम करतो. अटकेनंतर त्याला नालासोपारा पोलिसांकडे सोपविण्यात आले. याच गुन्ह्यांत तो पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.