वाहतूक शिपायाला धक्काबुक्की व धमकाविणार्यास अटक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाने हुज्जत घातण्याचा प्रयत्न
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 मार्च 2025
मुंबई, – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाने वाहतूक पोलीस शिपायाशी हुज्जत घालून, शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिवम सुभाष शुक्ला या 27 वर्षांच्या प्रॉपटी एजंटविरुद्ध साकिनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मद्यप्राशन करुन धोकादायक अवस्थेत बाईक चालविताना अडविल्याने रागाच्या भरात शिवमने भरस्त्यात धिंगाणा घालून पोलीस शिपायाच्या अंगावर धावून आपण संघाचा कार्यकर्ता असल्याचे सांगून कारवाई केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. पूर्वी विविध राजकीय पक्षाच्या, नेत्यांच्या, बड्या बापाच्या नावाने पोलिसांना धमकी दिली जात होती, आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता सांगून धमकी दिली जात असल्याचे या घटनेवरुन उघडकीस आले आहे.
जालिंदर बाळू मोहिते हे पडघा परिसरात राहत असून सध्या साकिनाका वाहतूक विभागात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी दुपारी तीन वाजता नेहमीप्रमाणे कामावर हजर झाले होते. त्यानंतर त्यांना साकिनाका येथील काजूपाडा, 90 फिट रोडवर असल्फा रोडवर कर्तव्य बजाविण्याची नेमणूक देण्यात आली होती. सायंकाळी सात वाजता तिथे कर्तव्य बजावत असताना त्यांना एक बाईकस्वार भरवेगात धोकादायक अवस्थेत बाईक चालवत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी त्याला बाईक चालविण्याबाबत विचारणा केली असता त्याने त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक तपासात त्याने मद्यप्राशन केल्याचे वाटत होते. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे, तुझी हिम्मत कशी झाली माझी बाईक थांबवायची. तुझे आयुष्य बर्बाद करुन टाकेन अशी धमकी दिली होती. तो त्यांना सतत शिवीगाळ करुन धमकी देत होता. त्यामुळे त्यांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरु केली होती. यावेळी त्याने त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केल्यास जिवे मारण्यासची धमकी देत त्यांच्या अंगावर धावून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला.
वारंवार समजूत घालूनही तो त्यांना शिवीगाळ करुन हुज्जत घालण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्यांनी ही माहिती कंट्रोल रुमला दिली होती. ही माहिती कंट्रोल रुममधून प्राप्त होताच साकिनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालून शिवीगाळ व धक्काबुक्की करणार्या या तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले चौकशीत त्याचे नाव शिवम शुक्ला असल्याचे उघडकीस आले. तो सायन येथील वृंदावन हॉटेलजवळील तुळजाबाई शेरखान सदन चाळीत राहत असून प्रॉपटी एजंट म्हणून काम करत असल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडे वाहन परवान्याची मागणी केली असता त्याच्याकडे वाहन परवाना नव्हता. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. वाहतूक पोलिसांनी त्याचा ब्लो घेतला असता त्याने मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले.
या घटनेनंतर पोलीस शिपाई जालिंदर मोहिते यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कर्तव्य बजाविणार्या पोलिसांशी हुज्जत घालणे, शिवीगाळ करुन धक्काबुक्की करणे, कारवाई केल्यास जिवे मारण्याची धमकी देणे तसेच मद्यप्राशन करुन बाईक चालवून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याच्यावर नंतर कारवाई करण्यात आली होती.