मानवी तस्करीप्रकरणी वॉण्टेड असलेल्या आरोपीस अटक

नोकरीच्या नावाने ऐंशी व्यक्तींना विदेशात पाठविल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 मार्च 2025
मुंबई, – मानवी तस्करीप्रकरणी वॉण्टेड असलेल्या एका आरोपीस गुरुवारी गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. रामेश्वरप्रताप रामजतन सिंग असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने नोकरीच्या आमिषाने बोगस पासपोर्ट आणि व्हिसा बनवून आतापर्यंत ऐंशी व्यक्तींना विदेशात पाठविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून ते सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यात रोशन भास्कर दूदवाडकर, अजीत जगदीश पुरी, इम्तियाज अली मोहम्मद हनीफ शेख, सुधीर सूर्यकांत सावंत संजय दत्ताराम चव्हाण अशी या पाचजणांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

28 फेब्रुवारीला विदेशी प्रादेशिक नोंदणी अधिकार्‍यांकडून सहपोलीस आयुक्तांना एक पत्र पाठविण्यात आले होते. त्यात मानवी तस्करी करणारी एक टोळी शहरात कार्यरत असून या टोळीने विदेशात नोकरीचे आमिष दाखवून आतापर्यंत अनेकांना कॅनडा, नेदरलँड, टर्की, पोलंड आदी देशात पाठविले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याची विनंती केली होती. यावेळी संबंधित विभागाने ऐंशी भारतीयांची एक यादीच त्यांना सादर केली होती. त्यात त्यांचे नावे, पासपोर्ट, प्रवास केलेल्या फ्लाईट डिटेल आदींचा समावेश होता. या तक्रारीची सहपोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेत गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाला तपासाचे आदेश दिले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या रोशन दुदवाडकर या 50 वर्षांच्या एजंटला ताब्यात घेतले होते.

त्याच्या चौकशीत त्याने त्याच्या इतर सहकार्‍यांच्या मदतीने अनेकांना विदेशात नोकरीचे आमिष दाखविले होते. नोकरीसाठी विदेशात कायमच्या वास्तव्यासाठी त्यांच्याकडून लाखो रुपये घेतले होते. त्यांचे बोगस पासपोर्ट आणि व्हिसा तयार करुन त्यांना युरोप, अमेरिका आणि आखाती देशात पाठविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला 28 फेब्रुवारीला पोलिसांनी अटक केली. त्याच्या चौकशीनंतर 1 मार्चला अजीत पुरी, 2 मार्चला इम्तियाज शेख, 5 मार्चला सुधीर सावंत आणि संजय चव्हाण या पाचजणांना पोलिसांनी अट केली होती. ते सर्वजण सध्या पोलीस कोठडीत आहेत.

याच गुन्ह्यांत रामेश्वरप्रताप सिंग याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते. अखेर त्याला गुरुवारी या पथकाने अटक केली. अटकेनंतर शुक्रवारी दुपारी त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तो मिरारोडचा रहिवाशी असून त्याने इतर आरोपींना मदत केल्याचे उघडकीस आले आहे. या टोळीने आतापर्यंत ऐंशी भारतीयांना नोकरीच्या आमिषाने कॅनडा, नेदरलँड, टर्की, पोलंडसह इतर देशात पाठविल्याचे उघडकीस आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page