मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 मार्च 2025
मुंबई, – मानखुर्द येथील अपघातात एका 35 वर्षांच्या पादचार्याचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीची ओळख पटली नसून त्याची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहे. याप्रकणी हलगर्जीपणाने गाडी चालवून एका पादचार्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अब्दुल अहाद अब्दुल समद शेख या गाडीचालकाविरुद्ध मानखुर्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने त्याची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
हा अपघात गुरुवारी सायंकाळी पावणेसात वाजता मानखुर्द येथील सायनकडून पनवेलला जाणार्या श्रद्धा गेस्ट हाऊससमोरील उत्तर वाहिनीवर झाला. गुरुवारी सायंकाळी सहाय्यक फौजदार संतोष कांबळे, पोलीस हवालदार अनिल खिलारी, सर्जेराव ढेरे व इतर पोलीस पथक परिसरात गस्त घालत होते. यावेळी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममधून त्यांना श्रद्धा गेस्ट हाऊससमोर अपघात झाल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीनंतर संबंधित पोलीस पथक तिथे रवाना झाले होते. घटनास्थळी पोलिसांना टाटा कंपनीच्या एका दहा चाकी असलेली गाडीने डिवायडरला धडक दिल्याचे तसेच काही अंतरावर एक 35 वर्षांचा व्यक्ती जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आले. रक्तबंबाळ झालेल्या या व्यक्तीला तातडीने जवळच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
घटनास्थळी असलेल्या चालक अब्दुल अहाद शेख याला नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याने हलगर्जीपणाने गाडी चालवून रस्त्यावरुन जाणार्या व्यक्तीला धडक दिली होती. ही धडक इतकी भीषण होती की, त्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्याचा उजवा पाय कंबरेपासून तुटून चेंदामेदा झाला होात, उजवा हात खांद्यापासून तुटलेला होता, पोटात गंभीर दुखापत झाली होती. या व्यक्तीची ओळख पटली नव्हती. त्याची ओळख पटेल अशी कोणतीही वस्तू सापडली नाही. त्यामुळे पोलिसांनी अपघाताची नोंद करुन चालक अब्दुल अहाद शेख याला अटक केली. अटकेनंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. मृत व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून त्याची ओळख पटावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहे.