सोने तस्करीच्या दोन कारवाईत महिलेसह चौघांना अटक
3 कोटी 67 लाखांचे साडेचार किलो सोन्याची पावडर जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 मार्च 2025
मुंबई, – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करीच्या दोन वेगवेळ्या कारवाईचा सीमा शुल्क विभागाने पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत एका महिलेसह चौघांना अटक करण्यात आली असून त्यात तीन खाजगी विमानतळ कर्मचार्यांचा समावेश आहे. अंशू सेवालाल गुप्ता, मोहम्मद इम्रान नागोरी, प्रदीप कल्याणसिंग पवार आणि सय्यद मेहतब अशी या चौघांची नावे आहेत. या कारवाईत या अधिकार्यांनी 3 कोटी 67 लाख रुपयांचे साडेचार किलो सोन्याची पावडर जप्त केली आहे. अटकेनंतर या चौघांनाही शुक्रवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रग्ज आणि सोने तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाल्यामुळे कस्टम अधिकार्यांनी अशा तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना शुकवारी सकाळी प्रदीप पवार याला आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम हवाई गुप्तचर विभागाने संशयावरुन चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत या अधिकार्यांना सोन्याची पावडर सापडली होती. पॅण्टमध्ये लपवून तो सोन्याची पावडर विमानतळाबाहेर घेऊन जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्यापूर्वीच त्याला या अधिकार्यांनी ताब्यात घेतले होते. त्याला ती सोन्याची पावडर एका प्रवाशाने दिली होती. त्यानंतर मोहम्मद इम्रान नागोरी या प्रवाशाला या अधिकार्यांनी ताब्यात घेतले होते. तो हॅण्डलर म्हणून काम करत असून विमानतळ कर्मचार्याच्या मदतीने सोने तस्करी करत होता. त्याने आतापर्यंत विदेशात पाच ते सहा वेळा सोने आणून त्यांच्या मदतीने ते सोने विमानतळाबाहेर आणले होते. याकामी तो त्यांना ठराविक रक्कमेचे कमिशन देत होता.
या कामासाठी त्याने प्रदीपला 50 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या चौकशीत या गुन्ह्यांत अंशू गुप्ता हिचा सहभाग उघडकीस आला होता. त्यामुळे तिलाही नंतर या अधिकार्यांनी ताब्यात घेतले. या तिघांकडून या अधिकार्यांनी 1 कोटी 31 लाखांचे 1610 ग्रॅम वजनाची सोन्याची पावडर जप्त केली आहे. अशाच दुसर्या कारवाईत सीमा शुल्क विभागाने सय्यद मेहताब याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून या अधिकार्यांनी सात कॅप्सुल जप्त केली असून त्यात 2900 ग्रॅम वजनाची सोन्याची पावडर होती. या पावडरची कंमत 2 कोटी 36 लाख रुपये इतकी किंमत आहे. त्याने त्या कॅप्सुल त्याच्या ट्रॉऊधझरमध्ये लपवून ठेवले होते. त्याला त्या कॅप्सुल एका प्रवाशाने दिले होते. विमानतळाबाहेर कॅप्सुल दिल्यानंतर त्याला या प्रवाशाकडून ठराविक रक्कमेचे कमिशन मिळणार होते. मात्र त्यापूर्वीच त्याला या अधिकार्यांनी अटक केली.
सोने तस्करीच्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करुन या अधिकार्यांनी चारही आरोपींना अटक केली होती. याच गुन्ह्यांत त्यांना रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.