मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 मार्च 2025
मुंबई, – सायन येथील एका शाळेतील बारा वर्षांच्या मुलीवर बसचालकाने आठ महिने अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाच मालाड येथे अशीच दुसरी घटना उघडकीस आली आहे. पंधरा वर्षांच्या मुलीशी मैत्री करुन शाळेच्या एका माजी बसचालकाने तिच्यावर गोराईतील एका हॉटेलमध्ये लैगिंक अत्याचार करुन तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढून तिला धमकी दिली. याप्रकरणी पिडीत मुलीच्या तक्रारीनंतर कुरार पोलिसांनी शादाब नावाच्या 32 वर्षांच्या बसचालकाविरुद्ध लैगिंक अत्याचारासह धमकी देणे आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याच्यावर अटकेची कारवाई केली आहे. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पंधरा वर्षांची पिडीत मुलगी ही मालाड परिसरात राहत असून याच परिसरातील एका शाळेत शिक्षण घेते. याच शाळेत शादाब हा पूर्वी बसचालक म्हणून काम करत होता. याच दरम्यान त्याने तिच्याशी मैत्री केली होती. या मैत्रीनंतर ती अल्पवयीन असल्याचे माहित असतान त्याने तिला प्रपोज केले होते. अनेकदा ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. यावेळी तो तिला बाहेर फिरायला येण्यास सांगत होता. नोव्हेंबर व डिसेंबर 2024 या कालावधीत त्याने तिला गोराई बिचजवळील एका हॉटेलमध्ये आणले होते. तिथेच त्याने तिच्याशी जवळीक साधून तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. त्याच्या मोबाईलवर त्यांच्यातील शारीरिक संबंधाचे काही अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढले होते.
हा प्रकार कोणालाही सांगू नकोस नाहीतर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ सर्वत्र व्हायरल करण्याची तो तिला सतत धमकी देत होता. या प्रकारामुळे ती प्रचंड घाबरली होती. त्यामुळे तिने कुरार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे शादाबविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह धमकी देणे आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच 32 वर्षांच्या बसचालक शादाब याला गुरुवारी कुरार पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत मुलीची कूपर हॉस्पिटलमध्ये मेडीकल झाली असून आरोपी लवकरच मेडीकल होणार आहे. याच गुन्ह्यांत गोराई बिचच्या हॉटेलच्या कर्मचार्यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.