एनर्जी ड्रिक्सच्या जाहिरातीसाठी 25 सेलिबिटींचा मानधनाचा अपहार
1.49 कोटीच्या फसवणुकीप्रकरणी खाजगी कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 मार्च 2025
मुंबई, दि. 15 (प्रतिनिधी) – एनर्जी ड्रिक्सच्या जाहिरातीसाठी 25 सेलिबिटींसह एका खाजगी कंपनीच्या मानधनाच्या 1 कोटी 49 लाख रुपयांचा अपहार करुन फसवणुक झाल्याचा प्रकार चेंबूर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी स्कॉय 63 एनर्जी ड्रिंक्स या खाजगी कंपनीच्या संचालकासह अधिकार्याविरुद्ध चेंबूर पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तनिश छाजेड, मनू श्रीवास्तव, फैजल रफिक इद्रीसी, रितिक पांचाळ आणि अब्दुल अशी या पाचजणांची नावे आहेत. पाचही आरोपी पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. आरोपींच्या अटकेसाठी चेंबूर पोलिसांचे एक विशेष पथक लवकरच मध्यप्रदेशला जाणार आहे.
रोशन गैरी बिंदर ही महिला अंधेरीतील ओशिवरा परिसरात राहते. तिचा सेलिब्रिटी मॅनेजमेंटचा व्यवसाय असून तिची आयमन इंटरटेनमेंट नावाची एक खाजगी कंपनी आहे. ही कंपनी सोशल मिडीयावरील सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी सिने-मालिका सेलिब्रिटी उपलब्ध करुन देण्याचे काम करते. कंपनीचे मुख्य कार्यालय चेंबूर येथील जनता मार्केट, शॉप क्रमांक पाचमध्ये आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यांत तिला स्कॉय 63 एनर्जी ड्रिंक्स या कंपनीचा कॉल आला होता. त्यांना त्याचंया कंपनीच्या एनर्जी ड्रिंक्सचा प्रचार करायचा आहे. त्यासाठी 25 सेलिब्रिटींची आवश्कता असल्याचे सांगितले होते. त्यासाठी कंपनीच्या संचालक तनिश छाजेड आणि मनू श्रीवास्तव यांनी तिच्या कंपनीला दहा लाख रुपये एनईएफटीद्वारे पाठविले होते.
10 ऑगस्टला या दोघांनी तिला फोन करुन कंपनीची पार्टी दादर येथील बेस्टि हॉटेलमध्ये आयोजित केल्याचे सांगून तिथे सर्व सेलिब्रिटींना हजर राहण्यास सांगा अशी विनंती केली होती. त्यामुळे ती तिच्या स्टाफ आणि अर्जुन बिजलानी, अभिषेक बजाज, रुतविक दांजियानी, हर्ष राजपूत, मन्नारा चौप्रासह शंभरहून अधिक सेलिबिटी कलाकार पार्टीत हजर होते. त्यात कंपनीने 25 सेलिबिटींची निवड केली होती. त्यांचे मानधन म्हणून 1 कोटी 32 लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्यासाठी तनिश आणि मनू हे दोघेही तयार झाले होते. त्यानंतर तिने पंधरा लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले,
मात्र ही रक्कम बँकेत जमा झाली नव्हती. त्यानंतर त्यांनी 35 दिवसांत संपूर्ण पेमेंट करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून तिने कंपनीची एनर्जी ड्रिंक्सची जाहिरातीचे काम सुरु केले होते. योवेळी त्यांनी सेलिबिटींना प्रत्येकी दोन आणि नव्वद लाखांचे धनादेश दिले होते, मात्र ते धनादेश बँकेत न वटता परत आले होते. या दोघांनी तिला साडेबावीस लाखांचे दिराम बँक जमा केल्याचे सांगितले, मात्र ही रक्कम जमा झाली नव्हती. वेळोवेळी त्यांनी पेमेंट केल्याचे धनादेश व्हॉटअप पाठविले होते, मात्र ही रक्कम त्यांच्या कंपनीच्या बँक खात्यात जमा झाली नव्हती. त्यांनी दिलेले सर्व धनादेश बँकेत न वटता परत आले होते. जानेवारी 2025 रोजी तनिश छाजेडने सेलिबिटींचे 1 कोटी 32 लाख रुपये व्याजासहीत देण्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे आश्वासन दिले होते, मात्र त्यांनी ही रक्कम अद्याप दिली नव्हती.
अशा प्रकारे स्कॉय 63 एनर्जी ड्रिंक्स कंपनीने तनिश छाजेड, मनू श्रीवास्तव, फैजल इद्रीसी, रितीक पांचाळ आणि अब्दुल या पाचजणांनी त्यांच्या कंपनीच्या एनर्जी ड्रिंक्ससाठी 25 सेलिबिटींना मानधन आणि तक्रारदार रोशन बिंदर यांचे कमिशनचे सतरा लाख असे 1 कोटी 49 लाखांचे पेमेंट न करता फसवणुक केली होती. बोगस स्वाक्षरी करुन धनादेश न वटता परत येणार याची माहिती असताना बोगस धनादेश दिले होते. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच कंपनीच्या वतीने रोशन बिंदर यांनी चेंबूर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पाचही आरोपीविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मूळचे मध्यप्रदेशच्या इंदौर शहराचे रहिवाशी आहेत. त्यामुळे आरोपींच्या चौकशीसह समन्स बजाविण्यासाठी चेंबूर पोलिसांचे विशेष पथक लवकरच मध्यप्रदेशात जाणार आहे.
आरोपींनी ज्या 25 सेलिबिटींच्या पेमेंटचा अपहार केला, त्यात अंकिता लोखंडे, आयुष शर्मा, अभिषेक बजाज, आद्रिजा रॉय, बशीर अली, नियती फतनानी, पार्थ कलनावत, समर्थ जुरैल, हेली शाह, कशिष, अंकित गुप्ता, मोहीत मलिक, विजयेंद्र कुमेरिया, जन्नत जुबेर, तेजस्वी, करण कुंद्रा, मिकी शर्मा, रिधीमा पंडित, जय भानुशाली, कुशन टंडन, विभा आनंद, सना सुल्तान, भूमिका गुरांग, ध्वनी पवार, सना मकबूल यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.