पत्नीची हत्या करुन पुरावा नष्ट करणार्‍या पतीला अटक

ज्वेलरी शॉपच्या पाकिटावरुन हत्येचा पर्दाफाश करण्यात यश

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 मार्च 2025
नालासोपारा, – कौटुंबिक वादातून होणार्‍या भांडणाला कंटाळून जानेवारी महिन्यांत राहत्या घरी पत्नीची गळा आवळून हत्या करुन नंतर तिचे शिर धडापासून वेगळे करुन हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आरोपी पतीला गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. उत्पला हरिश हिप्परगी असे 51 वर्षांच्या हत्या झालेल्या महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी तिचा पती हरिश बरवराज हिप्परगी (49) याला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मांडवी पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. मृतदेहाजवळ सापडलेल्या ज्वेलरी शॉपच्या पाकिटावरुन या हत्येचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.

गुरुवारी 13 मार्चला सायंकाळी सहा वाजता मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ट्रॅव्हेलिंग बॅगेत महिलेचा शिर सापडला होता. तिचे शिर धडापासू वेगळे करुन हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणी मांडवी पोलिसांनी अज्ञात मारेकर्‍याविरुद्ध हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकणी गुन्हा दाखल केला होता. या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. घटनास्थळी पोलिसांना एका ज्वेलरी शॉपचे पाकिट सापडले होते. ते पाकिट ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी संबंधित ज्वेलरी शॉपच्या मालकाला संपर्क साधला होता. त्याच्या चौकशीत ती महिला तिच्या कुटुंबियांसोबत मुंबई शहरात राहत असल्यासचे उघडकीस आले. त्यानंतर तिच्या कुटुंबियांची पोलिसांनी माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र तिच्या कुटुंबियांची माहिती मिळू शकली नाही. तिचे कुटुंबिय काही दिवसांपूर्वीच कोलकाता येथे गेल्याचे पोलिसांना समजले होते. त्यामुळे कोलकाता येथील महिलेच्या नातेवाईकांना संपर्क साधण्यात आला होता. चौकशीदरम्यान महिलेचे नाव उत्पला हरिश हिप्परशी (51) तसेच ती कोलकाता येथील 24 परगणा, नैहाटीची रहिवाशी असल्याचे उघडकीस आले होते. ती तिचा पती हरिश हिप्परशीसोबत राहत होती. मात्र दोन महिन्यांपासून तिचा कोणालाही संपर्क झाला नव्हता. मूळचा कर्नाटकचा रहिवाशी असलेला तिचा पती हरिश हा एका इमिटेशन ज्वेलरीमध्ये कामाला होता.

सध्या तो नालासोपारा येथील रेहमतनगर, रोनक अपार्टमेंटच्या रुम क्रमांक बी/101 मध्ये राहत होता. त्यामुळे हरिशला नालासोपारा येथून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याची चौकशी केल्यानंतर त्याचे त्याची पत्नी उत्पलासोबत काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरु होता. 8 जानेवारीला त्यांच्यात क्षुल्लक घरगुती कारणावरुन कडाक्याचे भांडण झाले होते. याच भांडणातून त्यासने रागाच्या भरात रात्री तीन वाजता तिची गळा आवळून हत्या केली होती. तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिचे शिर धडापासून वेगळे केले होते. ते शिर एका ट्रॅव्हेल बॅगमध्ये टाकून ते मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेंकून दिले होते.

ही कारवाई पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, पोलीस हवालदार मुकेश तटकरे, रमेश आलदार, सागर बारवकर, प्रशांत पाटील, अमोल कोरे, पोलीस अंमलदार राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमीत जाधव, आतिश पवार, तुषार दळवी, मनोहर तारडे, मसुब सागर सोनावणे, प्रविण वानखेडे, गणेश यादव, सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page