तीन हत्येच्या गुन्ह्यांतील तिन्ही मारेकर्‍यांना अटक करण्यात यश

पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या पथकातील कामगिरी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 मार्च 2025
कळवा, – कळवा विभागात झालेल्या तीन हत्येचा पर्दाफाश स्थानिक पोलिसांना यश आले आहे. या तिन्ही हत्येनंतर पळून गेलेल्या तिन्ही आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. संतोष महादेव लाड, अश्रफुल रुस्तम मोल्ला आणि सादिक इसाक सय्यद अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पहिली हत्या वैयक्तिक भांडणातून, दुसरी हत्या अनैतिक संबंधाच्या संशयावरुन तर तिसरी हत्या मोबाईल चोरीच्या वादातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

7 मार्चला विटावा बसस्टॉपजवळील एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या झाल्याची माहिती कळवा पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी पोलिसांना एका व्यक्तीचा मृतदेह मिळून आला होता. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. याप्रकरणी कळवा पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. तपासादरम्यान मृत व्यक्तीचे नाव अनिल बेहरा असल्याचे उघडकीस आले होते. अनिल हा झारखंडचा रहिवाशी होता. त्याचा आरोपी संतोष हा मित्र होता, हत्येच्या वेळेस या दोघांना काही लोकांनी पाहिले होते, त्यानंतर सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना संतोष लाड याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याचे अनिलसोबत क्षुल्लक कारणावरुन वैयक्तिक भांडण झाले होते. या भांडणानंतर रागाच्या भरात त्याने अनिलची दगडाने ठेचून हत्या केली होती.

दुसर्‍या गुन्ह्यांत झाकीर शहादत मोल्ला या 39 वर्षांच्या व्यक्तीच्या गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले होते. जखमी अवस्थेत त्याला कालसेकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यत आले होते. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस आयुक्त कोळेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक लामखडे, राजपूत व अन्य पोलीस पथकाने आरोपींचा शोध सुरु केला होता. तपासात मृत झाकीर व त्याचा मित्र अश्रफुल रुस्तम मोल्ला हे दोघेही मूळचे कोलकातचे रहिवाशी आहे. ते दोघेही मिळेल ते मजुरीचे काम करत होते. अश्रफुलचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र त्याला झाकीरचे तिच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे 11 मार्चला त्याने झाकीरला त्याच्या घरी बोलाविले होते. तिथेच या दोघांनी मद्यप्राशन केले होते. रात्री उशिरा त्याने दारुच्या नशेत झाकीरच्या गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करुन त्याची हत्या केली होती. या हत्येनंतर तो पळून गेला होता. अखेर अश्रफुल मोल्ला याला कल्याण येथून पोलिसांनी अटक केली.

तिसर्‍या घटनेत मोहम्मद राहुल अजीम राईन या 25 वर्षांच्या तरुणाची तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या करण्यात आली होती. मोहम्मद राहुल हा मुंब्रा येथे राहत होता. 12 फेब्रुवारीला त्याच्याावर अज्ञात व्यक्तीने तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला होता. सुरुवातीला त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आणि नंतर सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी त्याचा भाऊ मोहम्मद अबरार अजीम राईन याच्या तक्रारीवरुन मुंब्रा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक दवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंभार व अन्य पोलीस पथकाने आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना सादिक इसाक सय्यद या 19 वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी मुंब्रा बायपास परिसरातून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच मोहम्मद राहुलची हत्या केल्याची कबुली दिली. 10 मार्चला त्याने त्याच्यासह आजूबाजूच्या परिसरातील चार ते पाच घरातून मोबाईल चोरी केले होते. ही माहिती मोहम्मद राहुलला समजताच तो त्याचा मोबाईल घेण्यासाठी तिथे गेला होता. यावेळी त्यांच्यात वाद होऊन त्याने त्याची कटरसारख्या हत्याराने वार करुन हत्या केली होती.

अशा प्रकारे कळवा विभागातील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तिन्ही हत्येचा गुन्ह्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला. हत्येनंतर पळून गेलेल्या तिन्ही आरोपींना अटक केली. याच गुन्ह्यांत तिन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर, संदीपान शिंदे आणि अनिल शिंदे यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page