मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 मार्च 2025
बदलापूर – शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि बिल्डरला 50 लाखांच्या खंडणीसाठी धमकी देणार्या एका चौकडीला बदलापूर पूर्व पोलिसांनी अटक केली. अक्षय ऊर्फ बकरी गोविंद जाधव, रोनित दयानंद आडारकर, दिपक मधुकर वाघमारे आणि पुष्कर हरिदास कदम अशी या चौघांची नावे आहेत. यातील अक्षय जाधव हा मुख्य आरोपी असून त्यानेच खंडणीसाठी धमकी दिली होती. अटकेनंतर या चौघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध दरोड्यासह एनडीपीएसचे काही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
49 वर्षांचे तक्रारदार बिल्डर असून माजी नगरसेवक आहे. ते सध्या त्यांच्या कुटुंबियांसोबत बदलापूर परिसरात राहतात. फेब्रुवारी महिन्यांत त्यांच्या व्हॉटवर एका अज्ञात व्यक्तीने एक फोटो पाठविला होता. त्यात त्यांच्या एका महिलेसोबतचा अश्लील फोटो होता. हा फोटो त्यांच्या पत्नीसह नातेवाईकांना पाठविण्यची धमकी देऊन त्याने त्यांच्याकडे 50 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. खंडणीची रक्कम दिली नाहीतर अश्लील फोटो व्हायरल करुन त्यांची बदनामीची धमकी त्याने त्यांना दिली होती. त्यामुळे त्यांनी बदलापूर पूर्व पोलिसांत संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी खंडणीसाठी धमकी देणे आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर, पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद आरळेकर, सुनिल तारमळे, कुकले, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत थिटे, गोविंद चव्हाण, प्रशांत चव्हाण, पोलीस हवालदार जगदीश म्हस्कर, विजय गिरीगोसावी, सुधीर वरखंडे, गायकवाड, शिर्के, मिरकले, पाटोळे, पोलीस शिपाई पिसे, तानाजी पाटील, नेमाणे, पोलीस नाईक भारती, महिला पोलीस नाईक कल्याणी डुंबरे यांनी तपास सुरु केला होता. तक्रारदारांना ज्या मोबाईलवरुन खंडणीसाठी धमकी देण्यात आली होती, ऑडिओ क्लिपसह फोटो पाठविण्यात आले होते, त्याचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले होते.
त्यात अक्षय जाधव या आरोपीचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्याला बदलापूर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने तक्रारदार माजी नगरसेवकाच्या मोबाईलवर महिलेचे अश्लील फोटो पाठवून त्यांच्याकडे खंडणीची मागणी केल्याचे उघडकीस आले होते. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी रोनित आडारकर, दिपक वाघमारे आणि पुष्कर कदम या तिघांना अटक केली. या गुन्ह्यांत या तिघांनी अक्षय जाधवला मदत केली होती. त्यामुळे या चौघांनाही पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत चारही आरोपी पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.