मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 मार्च 2025
मुंबई, – पोलीस असल्याची बतावणी एका सेवानिवृत्त वयोवृद्ध महिलेला तिच्या कागदपत्रांचा गैरवापर करुन सिमकार्ड घेऊन, बँकेत खाते उघडून त्यात कोट्यवधी रुपयांचे मनी लॉड्रिंग तसेच मानवी तस्करीचा झाल्याचा आरोप करुन तिच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांत तिला डिजीटल अटकेची भीती दाखवून 5 कोटी 88 लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी एका कॉलेज तरुणाला दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली आहे. जौहाद जैऊल्ला खान असे या 21 वर्षांच्या तरुणाचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. फसवणुकीपैकी पाच लाखांची रक्कम जौहादच्या बँक खात्यात जमा झाल्याचे तसेच त्याने ही कॅश एटीएमद्वारे काढले होते. सायबर ठगांना बँक खाते पुरविल्याचे जौहादवर आरोप आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
यातील तक्रारदार वयोवृद्ध महिला ही सेवानिवृत्त असून सध्या घरी असते. 23 सप्टेंबर 2024 रोजी ती तिच्या घरी असताना तिला एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो पोलीस अधिकारी असल्याची बतावणी केली होती. तिच्या कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड काढण्यात आले आहे. तिच्या आधारकार्डवरुन एका नामांकित बँकेत खाते उघडून त्यात मोठ्या प्रमाणात मनी लॉड्रिंगची रक्कम जमा झाली आहे. तसेच याच कागदपत्रांवरुन मानवी तस्करी झाली आहे. याबाबत तिच्यासह इतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून तिला डिजीटल अटक झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्याच्यासह इतर आरोपींनी तिच्याशी संभाषण करुन तिच्या बँक खात्याची माहिती काढून तिला काही रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले होते. त्यामुळे तिने सप्टेंबर ते डिसेंबर 2024 या कालावधीत विविध बँक खात्यात 5 कोटी 88 लाख 86 हजार 257 रुपये ट्रान्सफर केले होते. चौकशीनंतर ही रक्कम तिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली जाईल असे सांगण्यात आले होते.
मात्र पैसे ट्रान्स्फर करताच तिला कोणाचाही कॉल आला नाही किंवा तिचे पैसे तिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाले नव्हते. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच तिने वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तोतयागिरी करुन पैशांचा अपहार करुन फसवणुक करणे आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या पथकाने तपास सुरु केला होता. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या सर्व बँक खात्याची माहिती पोलिसांनी काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यातील एक बँक खाते जौहाद खान याचे होते. याच बँक खात्यात पाच लाखांची कॅश जमा झाली होती. ही रक्कम नंतर एटीएमद्वारे काढली होती. त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस येताच त्याला मिरारोड येथून पोलिसांनी अटक केली.
तपासात जौहाद हा मिरारोड येथील एन. एच शाळेजवळील हैद्री चौक, एनज हेरीटेज अपार्टमेंटमध्ये राहत असून सध्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. तो दुबईत वास्तव्यास असलेल्या बसनभाई या व्यक्तीच्या संपर्कात होता. त्याच्याच सांगण्यावरुन त्याने त्याला त्याचा बँक खात्याची माहिती दिली होती. त्याकामी त्याला काही रक्कम कमिशन म्हणून देण्यात आली होती. त्याने अशाच प्रकारे इतर काही बँक खाती उघडल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे त्याची पोलिसाकडून चौकशी सुरु आहे.