शाळेत क्लार्क-शिपाई पदासाठी नोकरीच्या आमिषाने गंडा

पती-पत्नीची फसवणुक करणार्‍या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 मार्च 2025
मुंबई, – मानखुर्द येथील एकतानगर परिसरात असलेल्या अल फातिमा हायस्कूल शाळेत क्लार्क व शिपाई पदावर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून पती-पत्नीची सुमारे पंधरा लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खाजगी व्यक्तीसह शाळेच्या ट्रस्टीविरुद्ध मानखुर्द पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अमोल प्रल्हाद राऊत आणि इमान युनुस आझमी अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी महिलेला क्लार्क पदासाठी नियुक्ती झाल्याचे बोगस दस्तावेज देऊन कामावर ठेवले, मात्र सहा महिने उलटूनही तिला पगार दिला नाही तसेच तिच्या पतीकडून पैसे घेऊन त्याला शिपाई पदासाठी नोकरी मिळवून न देता फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

विद्या विकास शिंदे ही 34 वर्षांची महिला घाटकोपर येथे राहते. ती एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नर्स तर तिचे पती सुरक्षासरक्षक म्हणून कामाला आहे. तिचे एसवाय बीकॉपर्यंत शिक्षण झाले असून तिचे पती तिच्या नोकरीसाठी प्रयत्न करत होते. फेब्रुवारी 2023 रोजी त्यांच्या परिचित मित्रांनी त्यांना त्यांच्या परिचित प्रल्हाद राऊत हा शासकीय शाळेत नोकरी लावण्याचे काम करतो. त्याच्याकडे विचारणा केल्यास त्यांच्यासह त्यांच्या पत्नीला तो नक्कीच चांगली नोकरी मिळवून देईल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी अमोल राऊतला संपर्क साधून त्याची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मार्च 2023 त्यांची अमोलशी मानखुर्द येथे भेट झाली होती. यावेळी त्याने त्यांच्या पत्नीला महानगरपालिकेच्या शाळेत क्लार्क पदावर नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यात तिला सुरुवातीला 55 हजार रुपयांचे पेमेंट मिळेल. सहा महिन्यांत तिला कायमस्वरुपी कामावर ठेवले जाईल. या कामासाठी त्याने त्यांच्याकडे दहा लाखांची मागणी केली होती. त्यांच्या पत्नीला नोकरीची गरज होती, त्यामुळे त्यांनी दहा लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली होती.

ठरल्याप्रमाणे त्यांनी त्याला साडेआठ लाख रुपये दिले होते. त्यासाठी त्यांनी काही खाजगी फायनान्स कंपनीतून कर्ज घेतले होते. नोव्हेंबर 2023 रोजी अमोल हा त्यांना घेऊन मानखुर्द येथील अल फातिमा उर्दु हायस्कूलमध्ये आला होता. तिथेच त्याने त्यांची शाळेचे ट्रस्टी इमान आझमी यांच्याशी ओळख करुन दिली. काही वेळानतर इमानने त्यांच्या पत्नीला क्लार्क पदासाठी नियुक्ती झाल्याचे शाळेचे सही आणि शिक्का असलेले अपॉईटमेंट लेटर दिले होते. मात्र तीन महिने काम करुनही तिला पगार मिळाला नव्हता. याबाबत विचारणा केल्यानंतर इमान आझमी तिला टाळण्याचा ्रयत्न करत होता. याच दरम्यान अमोलने तिच्या पतीला शाळेत शिपाई पदासाठी नोकरी मिळवून देतो असे सांगून त्यासाठी साडेसात लाखांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी अमोलला साडेसात लाख रुपये दिले होते. अशाच प्रकारे या दोघांनी र्क्लाक आणि शिपाई पदासाठी अमोलला 15 लाख 34 हजार रुपये दिले होते. मात्र सहा महिने उलटूनही तिला पगार मिळाला नाही आणि तिच्या पतीला अमोलने शिपाई पदासाठी नोकरी मिळवून दिली नाही.

नोकरीसाठी त्यांनी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते, त्यामुळे त्यांना कर्जाची परतफेड करणे कठीण जात होते. वारंवार विचारणा करुनही या दोघांकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. काही दिवसांनी अमोलने त्यांना खोट्या केसमध्ये अटक करण्याची तसेच मारहाणीची धमकी दिली होती. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार मानखुर्द पोलिसांना सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर इमान आझमी यांनी तक्रार मागे घेण्यासाठी तिला कायमस्वरुपी नोकरीसह पगार देण्याचे मान्य करुन तसा खुलासापत्र दिले होते. याच दरम्यान त्याने त्यांना 90 हजार रुपये परत केले होते. मात्र दिलेले आश्वासन पूर्ण न करता या दोघांनी त्यांची फसवणुक केली. त्यांनी दिलेले धनादेश बँकेत न वटता परत आले होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अमोल राऊत आणि इमान आझमी यांच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page