आर्थिक गुन्हे शाखेची पहिली पॉलिग्राफ टेस्ट निगेटिव्ह
हितेश मेहताच्या गैरव्यवहाराची नव्याने चौकशी होणार
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 मार्च 2025
मुंबई, – प्रभादेवी आणि गोरेगाव येथून शाखेत काढलेल्या सुमारे 122 कोटीचा अपहार केल्याचा आरोप असलेला न्यू इंडिया सहकारी बँकेचा महाव्यवस्थापक आणि या कटातील मुख्य आरोपी हितेश प्रविणचंद्र मेहता याची मंगळवारी कालिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये झालेली लाय डिटेक्टर टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे हितेश मेहताच्या गैरव्यवहाराच्या पुराव्याच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेला नव्याने चौकशी करावी लागणार आहे. पहिली पॉलिग्राफ टेस्ट निगेटिव्ह आल्याने पोलिसांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जाते.
फेब्रुवारी महिन्यांत दुसर्या आठवड्यात न्यू इंडिया सहकारी बँकेत झालेल्या 122 कोटीच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी दादर पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. गुन्हा दाखल होताच बँकेचा महाव्यवस्थापक हितेश प्रविणचंद्र मेहता, विकासक धर्मेश जयंतीलाल पौन, बँकेचा माजी सीईओ अभिमन्यू सुरेंदरकुमार भोन, अरुणाचलम उल्लाहनाथन मारुथुवर ऊर्फ अरुणभाई आणि मनोहर उन्ननाथन अरुणाचलम या पाचजणांना पोलिसांनी अटक केली होती. तपासात आर्थिक व्यवहाराबाबत आरोपींकडून विसंगत माहिती येत होती. आरोपी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत होते. त्यामुळे या घोटाळ्यातील आर्थिक व्यवहाराबाबत पोलिसांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे हितेशची पोलिसांकडून लाय डिटेक्टर टेस्ट करण्याची तयारी सुरु करण्यात आली होती. टेस्टसाठी आवश्यक असलेली सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने किल्ला कोर्टात हितेशच्या लाय डिटेक्टर टेस्टसाठी अर्ज केला होता. यावेळी कोर्टाने पोलिसांना त्याच्या टेस्टची परवानगी दिली होती.
या परवानगीनंतर हितेशचा कारागृहातून ताबा घेऊन मंगळवारी 11 मार्चला त्याला कालिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये आणण्यात आले होते. तिथेच त्याची लाय डिटेक्टर टेस्ट पूर्ण करण्यात आली होती. तीन तास चाललेल्या या टेस्टमध्ये हितेश मेहताला एकूण 50 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यासाठी एक प्रश्नावली तयार करण्यात आली होती. त्याने हा घोटाळा कधी व कसा केला, याकामी त्याला कोणी मदत केली. त्याने पैशांची विल्हेवाट कशा प्रकारे लावली. त्याने कोणाला कधी, केव्हा आणि किती रुपये दिले याबाबत प्रश्न विचारण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाला असून निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे या गुन्ह्यांत जप्त केलेल्या पुराव्याच्या आधारे पोलिसांना त्यांची तपासाची दिशा ठरवावी लागणार आहे.