मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 मार्च 2025
मुंबई, – विनयभंगाच्या एका पळपुट्या आरोपीस जुहू पोलिसांनी शिताफीने अटक केली. सैफ बिराब्दुल खान असे या आरोपीचे नाव असून त्याने तब्येत बिघडल्याचा बहाणा करुन पलायन केले होते. मात्र पळून गेलेल्या आरोपीला पाठलाग करुन पोलिसांनी काही तासांत अटक केली. कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विलेपार्ले येथे एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सैफ खानविरुद्ध जुहू पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यामुळे त्याला पोलीस बंदोबस्तात जुहू पोलीस ठाण्यात नेण्यात येत होते. विलेपार्ले येथील पवन हंसजवळ पोलिसांची गाडी येताच त्याने त्याची बिघडल्याचा बहाणा सुरु केला होता. मळमळ होत असून उलटी येत असल्याचे सांगून त्याने गाडी थांबविण्यास सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याला गाडीतून उतरविले होते.
ही संधी साधून त्याने पोलिसांच्या हातावर जोरात फटका मारुन पलायन केले होते. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी त्याचा पाठलाग केला होता. त्याने विमानतळाच्या भिंतीवरुन उडी मारली होती. यावेळी एका पोलीस शिपायाने त्याचा पाठलाग करुन भिंतीवरुन उडी मारुन पकडले. त्यात या शिपायाला दुखापत झाली होती. पळून जाणार्या सैफ खानला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी पोलीस शिपायाच्या तक्रारीवरुन त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत नंतर त्याच्यावर अटकेची कारवाई होणार आहे.