हत्येच्या गुन्ह्यांतील आरोपी पतीला अटक व कोठडी

कौटुंबिक वादातून केली होती पत्नीची गळा आवळून हत्या

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
17 मार्च 2025
मुंबई, – गोरेगाव येथील हत्येच्या गुन्ह्यांतील आरोपीला रात्री उशिरा अटक करण्यात गोरेगाव पोलिसांना यश आले आहे. रॉयल शेख असे या आरोपी पतीचे नाव असून गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. रात्री उशिरा त्याला गोरेगाव येथून पोलिसांनी अटक करुन सोमवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. रॉयलवर त्याची पत्नी रेखा खातून हिची कौटुंबिक वादातून टॉवेलच्या गमछाने गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे.

रेखा खातून ही तिचा पती रॉयल शेखसोबत गोरेगाव येथील राममंदिर, पी पाच इमारतीजवळील तिवारी चाळीत राहत होती. ते दोघेही मूळचे कोलकाताचे रहिवाशी असून काही महिन्यांपूर्वीच या दोघांचा विवाह झाला होता. कोलकाता येथे नोकरी मिळत नसल्याने या दोघांनी मुंबईत नोकरीसाठी जाण्याचा निर्णय घेतला होता. राहण्याची सोय नसल्याने ते दोघेही एका भाड्याच्या रुममधून राहून मजुरीचे काम करत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरु होते. त्यातून त्यांच्यात घरात नेहमी खटके उडत होते. रागाच्या भरात अनेकदा रॉय तिला शिवीगाळ करुन मारहाण करत होता. शनिवारी रात्री रेखा आणि रॉय यांच्यात पुन्हा क्षुल्लक कौटुंबिक कारणावरुन वाद झाला होता. या वादाचे पर्यावसान भांडण होऊन रागाच्या भरात त्याने तिला बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर त्याने तिची गळा आवळून हत्या केली होती. त्यानंतर तो पळून गेला होता.

हा प्रकार नंतर रेखा खातूनची मैत्रिण राखी खातून बीबी मैनुल शेख हिला समजताच तिने गोरेगाव पोलिसांना ही माहिती दिली होती. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी रेखा खातूनला जवळच्या ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. याप्रकरणी राखी खातूनच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रेखा खातूनचा पती रॉयल शेख याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. मात्र हत्येनंतर तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना रविवारी रात्री उशिरा त्याला गोरेगाव येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर सोमवारी दुपारी त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page