विलेपार्ले-पवई येथील अपघातात दोघांचा मृत्यू

दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन दोघांना अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 मार्च 2025
मुंबई, – विलेपार्ले आणि पवई येथील दोन वेगवेगळ्या अपघातात दोन दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 35 वर्षांच्या एका व्यक्तीची ओळख पटली नाही तर दुसर्‍या व्यक्तीचे विरेंद्र देवनाथ मिश्रा असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पवई आणि जुहू पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन जेसीबी चालक संतराम त्रिवेणी पाल आणि क्लिनर दत्ता विश्वनाथ शिंदे या दोघांना जुहू पोलिसांनी अटक केली आहे. पवई अपघातातील चालक जाहिद अलूमछाह अन्सारी हा अपघातानंतर पळून गेला होता, त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

पहिला अपघात रविवारी रात्री सव्वादोन वाजता विलेपार्ले येथील एस. व्ही रोड, गोल्डन टोबॅकोसमोर झाला. शनिवारी रात्री जुहू पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक परब, पोलीस हवालदार पवार, सावर्डे, पोलीस शिपाई ज्ञानेश्वर इंगुलकर हे परिसरात नाकाबंदी कर्तव्यावर होते. अंधेरीतील एस. व्ही रोड, भरुचाबाग परिसरात नाकाबंदी सुरु असताना या पथकाला विलेपार्ले यसेथील गोल्डन टोबॅकोसमोर अपघात झाल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यामुळे संबंधित पोलीस पथक तिथे रवाना झाले होते. घटनास्थळी पोलिसांना एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला तातडीने जवळच्या कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याची ओळख पटेल अशी कोणतीही वस्तू सापडली नाही.

प्राथमिक तपासात त्याच्या डोक्यावरुन अवजड वाहन गेल्याचे दिसून आले होते. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केली होती. त्यातील एका फुटेजमध्ये एका जेसीबीच्या वाहनाने रस्त्याच्या बाजूला झोपलेल्या मृत व्यक्तीच्या अंगावरुन जेसीबी वाहन चालविल्याने तो गंभीर जखमी झाला होता. जखमी झालेल्या व्यक्तीला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची पोलिसांना माहिती न देता चालक आणि क्लिअर पळून गेले होते. या जेसीबी क्रमांकावरुन काही तासांत पोलिसांनी चालक चालक संतराम त्रिवेणी पाल आणि क्लिनर दत्ता विश्वनाथ शिंदे या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच संबंधित मृत व्यक्तीला धडक देऊन अपघातानंतर पलायन केल्याची कबुली दिली. याच गुन्ह्यांत नंतर या दोघांनाही अटक करण्यात आली होती.

दुसरा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता पवईतील जेव्हीएलआर रोड, पवई-प्लाझा सिग्नल येथून कांजूरमार्गकडे जाणार्‍या वाहिनीवर झाला. 40 वर्षांचा विरेंद्र देवनाथ मिश्रा हा पवईतील अय्यप्पा मंदिर, हरिओमनगरचा रहिवाशी होता. शुक्रवारी सायंकाळी तो त्याच्या अ‍ॅक्टिव्हा बाईकवरुन कांजूरमार्गच्या दिशेने जात होते. ही बाईक पवई प्लाझा सिग्नलजवळ एका टेम्पोने त्याच्या बाईकला धडक दिली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने जवळच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे विरेंद्र मिश्रा याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातानंतर टेम्पोचालक जाहिद अलूमछाह अन्सारी घटनास्थळाहून पळून गेला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने टेम्पो चालवून एका बाईकस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. अपघाताची माहिती नंतर त्याच्या कुटुंबियासह नातेवाईकांना देण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page